प्रस्तावना

१७५६ च्या जानेवारींत बाळाजी बाजीरावानें, सदाशिव चिमणाजी, जानोजी भोसले, मुधोजी भोसले, विठ्ठल शिवदेव, महादोबा पुरंधरे, मल्हारराव होळकर इत्यादि मंडळींसह सावनुराला (२४) वेढा दिला. रघुनाथरावदादा हिंदुस्थानांतून १७५५ च्या ऑगस्टांत पुण्यास येऊन, तेथून गलगल्यास आपलें लग्न करून, बाळाजीस सावनुरास मिळाले व तेथून निघून त्यांनी कितूरावर (२१) स्वारी केली. मानाजीनें संभाजीवर विजयदुर्गास (२६) स्वारी केली. १७५६ च्या सप्टेंबर-ऑक्टोबरांत रघुनाथराव दादांनीं सदाशिव रामचंद्राला घेऊन गुजराथेवर स्वारी केली.

१७५७ च्या जानेवारींत बाळाजी बाजीरावानें श्रीरंगपट्टणावर (२७) स्वारी केली. गोपाळराव पटवर्धनानें सौंधेबिदनूर प्रांतांतून श्रीरंगपट्टणाला (२८) जबरदस्त शह दिला व बळवंतराव मेहेंदळ्यानें गुतीकडून चिक्ककृष्णराजाला चेपिलें. १७५६ च्या नोव्हेंबर-डिसेंबरांत व १७५७ च्या जानेवारी-जुनांत विश्वासराव व दत्ताजी ह्यांनीं सलाबतजंगावर (२९) स्वारी केली. १७५७ च्या जुलैंत बाळाजी पुण्यास आले व नंतर सप्टेंबरांत त्यांनीं निजामावर स्वारी करून विश्वासरावाच्या हातून सलाबताचा शिंदखेडास (३०) पराभव करविला. १७५७ त रघुनाथरावांनीं गुजराथेंतून हिंदुस्थानांत (३१) स्वारी केली.

१७५८ त रघुनाथरावांनीं लाहोरास (३२) स्वारी केली. बाळाजी बाजीराव व विश्वासराव ह्यांनीं निजामावर (३३) टेहळणी केली व जानोजी भोंसल्याला वठणीस आणिलें.

१७५९ त गोपाळराव पटवर्धनानें श्रीरंगपट्टणावर (३४) स्वारी केली. दत्ताजीनें रोहिलखंड व लाहोर या प्रदेशावर (३५) स्वारी केली आणि मानाजी व राघोजी आंग्रे यांणीं कांसे, उंदेरी इत्यादि शामळाच्या स्थलांवर (३६) चाल केली.

१७६० त भाऊंची उदगीरची (३७) मोहीम झाली. दत्ताजीचे अबदालीशीं (३८) युद्ध झालें. मल्हाररावाचें अबदालीशीं (३९) युद्ध झालें व पानिपतची (४०) मोहीम झाली.

१७६१ त पानिपतचीं शेपटें. (४१) जानोजी भोंसले, गोपाळराव पटवर्धन, रघुनाथराव, विसाजी कृष्ण, बाळाजी गोविंद इत्यादींनीं मराठ्यांची उध्वस्त झालेली सत्ता स्थापण्यास केलेले प्रयत्न. (४२) कोळ्यांचीं कोळवणांत बंडें.