[२६०]                                      ।। श्री ।।            २५ आक्टोबर १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः

पौष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मांस दोन चार पत्रें पाठविलीं कीं तुह्मीं व गोपाळराव गणेश एकत्र होऊन जलदीनें सुजातदौलाचे मुलकांत हंगामा करणें व रसद न चाले तें करणें. शेंपन्नास राऊत प्यादे येतील जातील, त्यांस लुटून मारून टाकीत जाणें. असें लिहीतच गेलों. परंतु तुह्मीं गढ घेत बसलां हें काय ? तरी याउपरि पत्रदर्शनीं सुजातदौलाचे मुलकांत हंगामा करणें. व अलीकडील रसद वगैरे मारीत जाणें. नेहमीं मुलकांत फिरावें. कोठें रसद मरावी. कोठें गांव लुटावा, वाट मारावी, माणसें मारून टाकावीं. दहशत बसवावी. हेंच नित्य करावें. मुलूक अंतरवेदींतील व गंगापारचा लुटीत जावा. वाटचे गांवे व रस्ते असतील त्यांस दहशत पडोन बेचिराख होत तें करावें + वारंवार लिहिणें तें लिहिलें; परंतु तुमचेकडून त्यास उपसर्ग करावा हें होत नाहीं. पायबंद बसत नाहीं. तरी याउपरि या गोष्टीस उशीर न लावणें. वरचेवरी वर्तमान लिहित जाणें. जाणिजे. छ १५ रबिलावल सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. हे विनंति. कुंजपुरा३१६ व पांच सात हजार फौज, पांचसा हजार प्यादा लूटला. यामुळें अबदालीचे लश्करांत दहशत पडली. कितेक लोक उठून जातात. अबदाली कुच करून बागपतेवर चार कोस कांहीं फौजहि उतरूं लागली. लौकरच त्याचें पारपत्य होईल. तुह्मीं तिकडून गनीमी३१७ त-हेनें उगळा लावावा. अबदाली अलीकडे ३१८आला. तुह्मीं पुढें येऊन वाटा त्याच्या माराव्या. कांहींच होऊन येत नाहीं. उत्तम नाहीं. सत्वर लिहिलेप्रमाणें करणें. हे विनंति.