[२२०]                                       ।। श्री ।।            २७ जुलै १७६०.

पुरवणी राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांस:

विनंति उपरि. पत्रें पाठविली ती पावलीं. सुजातदौले यांच्या मुलुखांत दंगा करावयाचा प्रकार लिहिला, त्यास मातबर मातबर जमीनदारांस पत्रें पाठवून लगामी लावून ठेविले आहेत. त्यांचे वकील आणून सविस्तर लिहितों. त्याजकडे कुमकेस सरकारची फौज दहा हजार यावी ह्मणजे सर्व गोष्टी ठीक होतील. परंतु काशींतील बंदोबस्त केला पाहिजे ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐशास, दिल्लीकडील काम उरकल्यानंतर पार फौज येईल. परंतु जमीदारांस बोलावून तालुक्यांत बखेडा करावयास विलंब न करणें. काशीचा बंदोबस्त तुह्मी हुजूर आलियानंतर केला जाईल. रवाना छ १४ जिल्हेज. बहुत काय लिहिणें. हे विनंति.