[१९९]                                        ।। श्री ।।              ८ जून १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि -

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. पत्र तुमचें तूर्त येत नाहीं. आतां खासास्वारी चमेलीवर उत्तर तीरीं आली. सरदाराच्या भेटी लौकरीच होतील. हफीज राहिमतखान आला आहे. याचेंहि बोलणें चालणें होऊन काय ठहराव होणें तो होईल. लेहून पाठऊं. त्यास, सुजाअतदौला पटणियाकडे जात होते ते माघारे आले. परंतु तुमचें या मजकुराचें लिहिलें आलें नाहीं व नजीबखान व जाहानखान बिठुरास गेले हेंहि वर्तमान आलें. त्यास, तुह्मी कोठें आहां ? काय मजकूर ? सुज्याअतदौल्याचा विचार काय? तुह्मीं त्यास सर्वविशीं लिहिलें कीं नाहीं ? इतके दिवस बोलत होते तें निदर्शनास यावें. आह्मी जवळ आलों. सरदार आह्मी येक होताच शत्रूच्या पारपत्याचा विचार घडेल. त्यास सुज्यातदौला यांणी फौजसुद्धां सामील व्हावयाचा विचार करावा. सांप्रत नजीबखान यांचे राजकारण लागलें आहे. त्यास, याचा आमचा स्नेह असतां. त्या राजकारणाची आस्ता करावी हें उचित नाहीं व ते करणार नाहींतच. परंतु आलें राजकारण तोडूं नये या भावें बोलत असतील तरी तेंहि न बोला. त्याचें राजकारण तोडून यावयाचें करावें. हे आलियावरी सर्व बंदोबस्त व उचित गोष्टी, पातशाही कामें, व अलीगोहर आणून पातशा करणें, इत्यादिक सर्व होऊन येईल. तरी याचा प्रकार सर्व त्याचा लेहून पाठवणें. संशय न राहाता येत असें करणें. तुमचें पत्र तिकडील बातमी वरचेवरी या दिवसांत यावी, हे करणें. जाणिजे. + छ २३ सवाल. बहुत काय लिहिणें. हे विनंति.