[१६१]                                        ।। श्री ।।                    ३० जानुआरी १७६०.

राजश्री मल्हारजी होळकर गोसावी यासि:

सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥ बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत असलें पाहिजे. विशेष. राजश्री दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे अबदालीवर गेले. त्यांची यांची गांठ पडून युद्ध जालें. ह्मणोन वर्तमान आलें. आपणांसहि वारंवार पत्रे पाठविलीं. अबदालीचें पारपत्य आधीं करावे. माधोसिंगाचा मजकूर आपणांस अगाध नाहीं. जेसमयीं चित्तावर धराल तेसमयीं कराल. तर लौकर जावें ह्मणोन लिहिलें होतें. बहुधा आपण गेलेच असतील. उभयतां एकत्र होऊन अबदालीस हतप्रभाव केल्याचें वर्तमान सत्वर ल्याहावें. इकडे निजामअल्लीखानांनीं बिघाड केला. त्याजवर चिरंजीव राजश्री भाऊ व दादा व राव गेले. उदगिरीसमीप गांठ पडून युद्ध झालें. त्यास नरम केलें. इकडील निर्गम सत्वरच होईल. चिरंजीव राजश्री दादा तिकडे अविलंबेंच येतील + जरूर आधीं अबदालीवर जावें. तें काम नीट जाहालिया सहजांत जयनगरचें (व) गैरे काम होईल. छ ११ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें. हे आशीर्वाद.