[१३४]                                        ।। श्री ।।                          १९ आगस्ट १७५९.

.चिरंजीव राजश्री बाबा प्रति गोविंद बल्लाळ आशीर्वाद. उपरि येथील कुशल ता।। भादो वद्य १२ जाणून आपलें कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्मीं काळीं चिठी पाठविली त्यांत राजश्री जनार्दनपंत यांहीं आपले चित्तीं संशय मानून रुमाल ठेऊन कैदकानूंत काडीइतकी तफावत करीत नाहीं. त्यास, त्यांजलाहि आह्मीं पत्र लिहिलें आहे. जामदारखानियावर कारकून ते ठेवणार तर सुखरूप ठेऊत. आह्मांस त्यांचे कारकून राहिलियानें वाईट काय? ज्यामध्यें त्यांचें समाधान तें आह्मांस करणें. सुखरूप त्यांचा कारकून जामदारखानियांत ठेवणे. वरकड येथील वर्तमान तर काळीं बिठुराहून कुच करून चचेडीस आलों. र।। गोपाळराऊ यासी बिदा करून देतों. दोन कारकून त्याचे रुजवातीस देऊन आह्मी एका दोन रोजांनीं येथील निर्गम करून उमरगडीं येतों आणि सत्वरच श्रीमंत र।। भाऊस्वामीकडे जाऊं. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.