[६६]                                                                    श्रीशंकर.                                                १९ जून १७५७.

 

सेवेसी विज्ञापना. बिजेसिंगाकडील१५० मातबर कारभारी सांप्रत येथे आले. सांप्रत बिजेसिंगाचा भाव असा आहे कीं शिंद्याशीं व आपल्याशीं सलोख करून घ्यावा. आह्मीं सांगू तें बिजेसिंग ऐकणार व दत्तबांनींही ऐकावें. लटका कजिया कशास करावा ? याखेरीज रुपयाची मामलत थोडीबहुत करावी, चाकरी बराबर करावी. लाहोर, मुलतान, दिल्ली, आगरे, प्रयाग, जेथपर्यंत न्याल तेथपर्यंत जाऊन चाकरी करून दाखवावी. परंतु रामसिंगास राज्य देऊं नये. ऐसा भाव आहे. आह्मांस कारभारी आले आहेत त्याचे जबानीं सांगोन पाठविलें आहे कीं जें तुह्मीं सांगाल त्यास आह्मीं कबूल. बलकी, एखाद्यास राज्य देववाल तरी देऊं. ऐसें सांगोन पाठवलें आहे. परंतु आह्मीं राज्य देवविल्यानें कोठे देतील! परंतु तोडमोड सांगूं ते ऐकतीलसें दिसतें. राजश्री दत्ताजी शिंदे येतील त्यांसहि आपण सांगावें; ह्मणजे दोघांचा सलुख करून देऊं. जर दत्तबांनीं ओढिलें तरी आमचा इलाज नाहीं; परंतु ओढिल्यास परिणाम उत्तम नाहीं. फिरोन खर्चाखालींच येतील व मामलताहि होणार नाहीं. ऐसें दिसतें. यामध्यें आपली मर्जी कशी ते ल्याहावी. आह्मीं तरी बिजेसिंगासी कबूल केलें कीं तुमचे तर्फेनें दत्तबास सांगूं व दत्तबाचे तर्फेनें तुह्मांस सांगू. तुह्मीं दोघांनींहि ऐकावें. तें त्यांनीं मान्य केलें. तुर्त आह्मीं मोघमच ठेविलें आहे व चाकरीस बोलावितों. बहुधा येतीलसें दिसतें. जेव्हां अबदाली ये प्रांतीं होता तेव्हां आमचे देखील सारे मुत्सदी ह्मणत होते कीं तुह्मीं बिजेसिंगाचे मुद्दे कबूल करून बोलावे ह्मणजे तुमचें राज्य राहील. नाहीं तरी, आता गोष्टी भारी पडली. तेव्हां बिजेसिंगाचे मुद्दे हे होते कीं मी एक खेडें रामसिंगास देणार नाहीं. अबदालीशीं लढाईची चाकरी मात्र करीन. मामलत रुपयाची सोडावी. फार तरी पांचचार लक्ष देईन. हे गोष्टी जर दत्तबानीं कबूल१५१ केली नाहीं, तरी तुह्मीं व मल्हारबांनीं माझे सोबती व्हावें ऐसें बोलत होते. तें आमचे सारे मुत्सदी कबूल करावें म्हणत होते व मल्हारबाचाहि भाव होता. मीं साफ सांगितलें कीं तुझा मुजाका आह्मी बाळगीत नाहीं. शिंद्यापेक्षां तूं आह्मांस अधिक नाहीं. फार जाहलें तरी आह्मांबरोबर येणार नाहींस. तरी तुजवाचून काय तटलें आहे? आमचे नशीबीं असेल तें होईल.पुण्यप्रताप तीर्थरूप नानासाहेबांचा आमचे मस्तकीं आहे. तरी आतां अबदालीस १५२मारतों. तूं फार जहालें तरी तिकडे जाशील. तेहि कबूल, परंतु हे गोष्टी कबूल करीत नाहीं. तेव्हां आठ दिवस दम धरून पाहिले. चहूंकडून इलाज केले. परंतु मीं एकच जाब दिल्हा की आतां नशिबावरी बेतली. आतां दत्तबा नसतां मी कबूल करणार नाहीं. दत्तबा असता तरी सांगतो. त्याजवर रागेंहि भरतो. परंतु पाठीमागे हें कबूल न करूं. तेव्हां आठा दिवसांनीं वकिलांनी कबूल केलें कीं आमचा व दत्तबाचा सलूख तुह्मीं मध्यें पडून करून द्यावा, आह्मी चाकरी करितों. तेव्हां वख्तावर नजर देऊन गोष्टी कबूल केली व वकिलास पाठविलें. तो जाऊन त्याचे कारभारी घेऊन आला. याशी बोललों ह्मणजे बिजेसिंगाह येईल, याप्रमाणें वर्तमान कच्चे स्वामीस दखलगिरी असावी ह्मणोन लिहिलें असे. दोनदा कागद वाचावा. हे विज्ञापना. पै॥ छ २० सवाल.