मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)

                                                                                                 पत्रांक ८                                                     फाल्गुन व. १०।१६९३

पो छ १३ मोहरम                                                          श्रीगणराज                                                     २८ मार्च १७७२ इ.                                    
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसी
पो गोपाळराव गोविंद कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ २३ जिल्हेज मंदवासर मु।। इटगे-मनापूर वर्तमान यथास्थित जाणून स्वकीयें कुशल लिहित असलें पाहिजे विशेष आपणाकडील बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं हें उचित कीं काय सदैव पत्रीं सविस्तर लिहून पाठवावें हैदरनाइकाचें पारपत्य पुर्ते जाहालें नाहीं व ठाणीं घेतलीं हीं फिरोन जातील व सावनुरकर भेटतील राजश्री मुरारराव घोरपडे भेटले सावनुरास अपाय होईल घोरपड्याच्या राहिल्या स्थळास उपद्रव करील अशा सर्व गोष्टी प्रतिकूल जाणोन छावणी करावी हा च मनसबा पक्का सर्वांच्या विचारें जाहाला दाणा-वैरण मिळत नाहीं यास्तव गांवखेडीं आपलीं च मोडावीं लागतात डोंगरची वैरण जाहाली म्हणजे एक जागा धरून दोन मास राहणार आमच्या सरंजामाचें वर्तमान बारी अलीकडील आम्हाकडे मिरज वगैरे तालुका सुटलेला सरकारची बेरीज दहा लक्ष त्यापैकीं वाजवी वसूल सात आठ लक्ष पीकपाणी जाहालें म्हणजे व्हावें त्यास गुदस्ता मिरज जमखिंडी यादवाड वगैरे येथें पर्जन्य दरोबस्त पडला नाहीं व बरवे व लक्ष्मण कोनेर यांनी धामधूम करून वसूल नेला आमच्या हातास येणें कळलें च परंतु कर्नाटकची स्वारी चार लोक बरकसे करून ठेवावे धनी समजतनासें नाहीं असे चित्तांत आणून सातहजार फौज ठेऊन यथामतीनें सेवाचाकरी केली छावणीस राहिलों सावनूरची अवघड चाकरी आम्हांस च सांगितली उपाय नाहीं जावें च लागलें खर्चीखालीं बेजार नित्य उपोषणें सरंजाम वर्कडाचा किती आणि फौज किती आमचा सरंजाम किती व फौज किती हें कोण पहातो एथील प्रकार म्हणाल तर तुम्हीं जाणत च आहा कारभारियांनीं पुणियांत वचन दिलें तें कांहीं स्मरण नाहीं खावंद तदाधीन तत्रापि आम्हीं कांहीं बोभाट सांगत नाहीं क्रिया स्मरोन आहों ते आपले गुण सोडीत नाहींत त्यांत शक्रगड गेलेपासून चित्त त्यांचे उद्विग्न दिसतें असो काळाचे दिवस घालवितों पुढें सर्व भार श्रीवर आहे चाळीसपन्नास राऊत व एक खासा ऐसा नेहमीं तेथें ठेवावा म्हणून आपण लिहिलें ऐसियास सालमजकुरीं तो प्रकार राहिला आपण व राजश्री मामा तेथें असता आणखी येऊन काय करणार तत्रापि आपले विचारें असलिया दसरा आलियावर राऊत पन्नास व कारकून एक शाहाणा अगर खासा एकजण पाठऊन देऊ कळावें तेथील सर्व रक्षणें तुम्हांकडे आहे आपले पागेविसी काळजी न करावी प्रस्तुत महागाई फार आहे कळेल ते रीतीनें चालवितों आपणाकारणें कांहीं ऐवज कर्जाचा पाठवावा असें चितांत आहे सोय पडतां च निमे ऐवज पावता करितों कळावें बहुत काय लिहिणे हे विनंति ।

राजश्री महादाजी पोंक्षे स्वामींस वामनराव गोविंद नमस्कार
पोष्य नारो कृष्ण व नीलकंठ त्रिंबक व मोरो बल्लाळ व वामनराव गोविंद व परशराम रामचंद्र कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति आपण कितेक शब्द लाऊन लिहिले एसियास स्वल्प आम्हांकडून पत्र यावयास दिवसगत लागली तत्रापि तें चित्तांत न आणावें आमचे गुणदोष चित्तांत न आणितां सर्व तेथील रक्षणें तुम्हां कडे आहे तुमचे पागेची काळजी तिळमात्र न करणें कळेल ते रीतीनें निभाऊं. बहुत काय लिहिणे हे विनंति.

सेवेसीं शिवाजी बावाजी म्हैसकर कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति आपणांकडून हमेष पंत्रे येतात परंतु सेवकाचे स्मरण होत नाहीं असें नसावें सदैव पत्र पाठवून सांभाळ करावा पागेची काळजी आपण करावीसें नाहीं येथील सरकारचे पागेप्रमाणे सर्व बेजमी करून देतात सेवेसीं श्रुत होय हे विनंति