मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)

                                                                                                पत्रांक ४

                                                                                     श्री.                                                              

राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसी
पे।। बाळजी जनार्दन सा। नमस्कार विनंति उपर येथील कुशल ता। छ ९ सफर पावतों वर्तमान यथास्थित असे विशेष श्रीमतांचें पत्र दुसरें लकरष्रांतून आलें कीं नारो बाबाजी कबूल न-च करितील तर विष्णु महादेव यांचे गळीं स्थळ सुद्धा खामखाय घालणें एतद्विषयी विस्तारयुक्त लिहून पाठविलें त्यावरून विष्णुपंतांसीं बहुतां प्रकारें बोलोन ठीक केलें कीं दीड लक्ष त्याणीं रसद करार केली त्याहून पाऊण लक्ष जाजतीं देतात किल्ल्यासुद्धां मामलत सांगावी त्यावरून आपणास लिहिले आहे तर मीं लिहिलें हें कोठें हि न दर्शवितां श्रीमंतांस विनंति करावी कीं पाऊण लक्ष रुपये ज्याजती रसद एक गृहस्त बोलतो जी मामलत वगैरे लक्षुमण कोनरीकडे असेल तितकें यांजकडे द्यावें लक्षुमण कोनेराचें फाजील सात लाख म्हणून गप्पा मारतात परंतु शोध केल्यास चार लाख पावतों होईल या फाजिलाचा कदाचित् अडथळा करितील तर मुरादखानाची जहागीर त्यास कैद केलें सबब जफ्त करावयास सांगितली ती अदमासें सत्तर ऐशीं हजार पावेतों आहे त्यापैकीं पंचवीसतीस निदानी चाळीस हजार पावेतों त्याचे रद्दकर्जी द्यावी श्रीमंतास समजवावें अशा प्रसंगी पाऊण लक्ष येतात अशा चार गोष्टी समजावून निदान पांचसा लाख पावेतों खाशास अंतस्त तुमचे विचारें देणें पडलें तरी कबूल करून आमचे नावें सरकारचें पत्र आमचा लेख न दर्शवितां पाठवावें कीं पाऊण लाख रुपये जाजती घेऊन विल्हे लावणें किल्यासुद्धां श्रीमंत अंतस्तास फार खुष आहेत यास्तव पांच सात हजार निदानीं अंतस्त देऊं करुन पक्की बळकटी श्रीमंताची करून घ्यावी कीं रावसाहेबानीं बापूनीं लिहून पाठविलें तरीं घालमेल करूं नये याप्रमाणें पक्का करार करून घेऊन गोपाळराव बर्व्याचा अभिमान धरला याप्रमाणें धरीत अशी तुमची निशा जालियावर यादीवर खासदस्तुरी करार करून घेवून सनद द्यावयाचे समयीं विष्णुपंताचें नांव प्रकट करवावें नाहींतर मध्ये च कळलियास सर्वांचा द्वेष त्याशीं पडून पेचांत आणितील यास्तव चांगले पक्की बळकटी करून घेऊन लिहून पाठवावें नाहींतर सुमार पाहून श्रीमंताची मर्जी नसली च तर तितकें च राहून द्यावें खामखा उलटावें असें च करून ठेविलें आहे पत्र फाडून टाकावें बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विनंति किल्ला आला तर च याप्रमाणें नाहीं तर कबूल नाहीं हे विनंति