मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

स्वस्थानीं आल्यावर त्यांनी पेशवाईच्या वांटणीचा प्रश्न काढला. पण रावसाहेब पेशवे या वेळी फौजबंद असून त्यांच्या शहाणपणाची व शूरत्वाची कीर्ति सर्वत्र पसरली होती. त्यांची दूरदृष्टी, आटोकाट शहाणपण, त्यांची आवर-शाक्ति इत्यादि गोष्टी व त्यांची कदर हीं अशीं कांहीं विलक्षण होतीं कीं, रावसाहेबांची छाप ‘तेथे कांहीं चाड नाहीं वयाची’ या न्यायानें सर्वत्र बसली. रावसाहेबांचें ठासून बोलणें व करारी स्वभाव पाहिल्याबरोबर दादासाहेब शरमले. व ‘आपलें २५ लक्ष रुपये कर्ज वारलें ह्मणजे आपण स्नानसंध्या करून राहूं’ असें त्यांनी आपल्या क्षणैकभंगुरवृत्तीनें रावसाहेबांस वचन दिलें. ही गोष्ट १७६७ च्या मे-जून मध्यें झाली.

इकडे महादजी शिंद्यांनीं दादासाहेबांच्या पाठीमागे ‘आपलें सरदारीचें काम पुरें करून द्या’ असा लकडा लावला. रावसाहेबांनींही रायरीकरांच्या फडणीशीचे हिशोब तपासले. याच समयी तुकोजी होळकर दक्षिणेस आले होते. त्यांच्या बरोबर गंगाधर यशवंत ऊर्फ गंगोबातात्या चंद्रचूड आले. त्यांचें व अहल्याबाईचें पटेना म्हणून त्यांनीं तेथील दिवाणगिरी सोडून शिंद्यांच्या राज्याची दिवाणगिरी करावी असा हेतु धरिला व महादजींस न कळवितां ( त्यांच्या परोक्ष ) रावसाहेबांजवळून महादजीच्या सरदारीची व्यवस्था लावण्याचा उपक्रम सुरू केला. गंगोबा तात्यांनी राज्याच्या व स्वतःच्या फायद्यासाठीं ज्या शर्ति महादजीच्या तर्फे कबूल करण्याचा घाट घातला, त्या महादजीसारख्या अभिवृद्धीच्छु पुरुषास कशा पसंत पडणार? त्यांनीं रायरीकरांस ‘आपलें वचन पूर्ण करा’ व पंत प्रधानांस व बापूंस ‘आपली फार गरीबी आहे’ अशा पत्रांची झोड उठविली व ‘रायरीकर मात्र आपल्या तर्फेनें बोलतील इतरांस बोलण्याचा अखत्यार नाहीं’ असें रावसाहेबांस स्पष्ट कळविलें. रायरीकरांस खुष करण्यासाठीं त्यांनी स्वदेशच्या सर्व शिंद्याकडील महालांचे सरसुभे नेमून त्यांनीं पाठविलेल्या सदाशिव केशव या नांवाच्या गृहस्थाच्या नांवें सनदा करून दिल्या. पेशव्यांनीं ही गंगोबातात्यांस शिंद्यांची मुतालकी देऊन दिवाणगिरी बाजी नरसिंह यांस दिली. पण गंगोबांचे प्रस्थ महादजीस नको होते. १७६७ च्या अक्टोबरमध्यें हा कारभार झाला. पुढें महादजी स्वतः १७६८ च्या ज्यूनच्या सुमारास दक्षिणेंत आले व त्यांनी आपल्या मनाप्रमाणे सर्व कारभार उरकून घेतला.

नंतर हिंदुस्थानचे स्वारींत त्यांनी होळकरासह रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण बिनीवाले यांच्या हाताखालीं राहून रोहिले व पठाण यांचा खासा समाचार घेतला, पातशाहीची व्यवस्था लाविली आणि सुजाउद्दवला व इंग्रज यांच्याशीं दोन हात व्हावयाचा खासा प्रसंग ते आणणार तों सर्व महाराष्ट्राच्या दुर्दैवानें थोरले माधवरावसाहेब मरण पावले आणि नानासाहेब पेशव्यांचे व रावसाहेबांचे विचार मनच्या मनींच राहून गेले. तसेंच, येथें माझें शिंदे प्रकरणाचा विषयप्रवेशही संपला.