मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

पण दादासाहेबांचा शिंद्यांवर मनस्वी राग होता. कारण काकड्याच्या मरणास शिंदे कारण झाले होते. यावेळी शिंद्यांनी व त्यांच्या कारभा-यांनीं नारोशंकरास जी पत्रें लिहिलीं आहेत, ती किती लीनतेची व आर्जवाचीं आहेत, हें आतांच प्रसिद्ध झालेल्या या खंडांतील पत्रांवरून स्पष्ट दिसेल. या वेळी सर्व ऐवजाच्या निशेसाठीं शिंद्यांनीं सर्व दक्षिणेंतील महालही नारोशंकरास लाऊन दिले होते ! असो; चिंतोपंत तात्यांचे बंधु मोरोविठ्ठल यांस शिंद्यांनीं रिक्तहस्त परत पाठविले होते, म्हणून रायरीकरांचाही राग शिंद्यावर होताच. पण नारोशंकरांनीं मध्ये पडून व सहालक्षापर्यंत सरकारांत नजराणा, रायरीकरास फडणिशी, इत्यादि कबूल करून दादासाहेबांस पल्लयावर आणिले.

हा वेळपर्यंत शिंदे कांहीं स्वस्थ बसलें नव्हतें. त्यांनी कोटेकरांची मामलत करून व मारवडची मामलत रगडून टाकून मल्हारराव सुभेदारांचा उपराळा करण्यासाठीं दिल्लीकडे प्रयाण केले होतें. इतकें व्हावयास १७६५ चा आगस्ट उजाडला. इकडे गणोजी कदम या नांवाच्या मनुष्यानें महादजीचें नांव सांगून रावसाहेब पेशव्यांपाशीं वाटतील ते करार-मदार कबूल केले होते. अर्थातच हे करार शिंद्यांस पसंत नव्हते व नारोशंकरांनींही आपलें औदासिन्य सोडून व गणोजीस फजीत करून ते करार मोठ्या कष्टानें नाहींसे केले. शेवटीं शिद्यांची सरदारी कायम झाली, व शिंद्यांनी नारोपंतनाना राजेबहादरांस हिंदुस्थानांत १७६५ च्या अखेर बोलाविलें, व ते दादासाहेबांबरोबर गेलेही.

राघोबादादासाहेब हिंदुस्थानांत पाऊल ठेवून काम करावयास आरंभ करणार तों मल्हारराव सुभेदार वैशाख शु॥ ११ (ता. २० मे १७६६ ) स दिवंगत झाले. मल्हारराव म्हणजे कर्ता पुरुष. अव्वल पासून मराठ्यांचा उत्कर्ष पाहिलेला व उत्कर्षास स्वतःच्या मर्दुमकीनें साहाय्य केलेला पुरुष मल्हारराव काका! गनिमी लढाई खेळावी अशी त्यानेंच. त्याला पातशाही सकट सर्व हिंदुस्थान चळवळा कांपत असें. तो मेला ह्मणजे मराठाबादशाहीचा उजवा हात गेला ! राघोबादादांची हिम्मतच खचली. तथापि त्यांनी उद्दिष्ट कामास हात घालून प्रथम गोहदेस वेढा दिला. इकडे शिंदेही उदेपूरच्या वगैरे मामलती आटपून गोहदेस आक्टोबरच्या सुमारास आले. तेव्हां रायरीकरांनी आपली फडणिशी पुनः कायम करून घेतली. इकडे जनकोजीचा तोतया आपल्या आश्रितांस सनदा देतच होता व त्यायोगें शिंद्याच्या मुलुखांत थोडीफार दंडेलगिरी होतच होती.

तथापि महादजीची व थोरल्या श्रीमंताची गांठ पडली तेव्हां सरदारकीचा मुख्य मान आपल्यास मिळावा असा त्यानें बूट काढला. या खलबतांत नारोशंकरची दिवाणगिरी निघाली, त्याची झांशी शिंद्यांस मिळाली व देशी परत गेल्यावर केदारजीस वजा करून महादजींस सरदारींची वस्त्रे द्यावयाचीं असें गुप्तपणें ठरलें. रायरीकरांची फडणिशी सनद शिंद्यांची व हुजूरची होऊन त्यांचा शिंद्यांकडील कर्जाचा फडशा झाला व रायरीकरांस शिंदखेड, येदलाबाद येथील दरकाच्या असाम्या करार झाल्या. तर्क आहे कीं अबापुरंद-यांनीं या वेळीं शिंद्यांचे तर्फेनें मदत केली असावी. पुढें दादासाहेबांनीं कसाबसा गोहदचा कारभार आटपून आपली आक्रमशक्ति नाहींशी झाली, असे दाखविलें; व नंतर इंदुरास येऊन त्या प्रसिद्ध साध्वी अहिल्याबाईच्या हातानें आपली नाचक्की करून घेतली ! याप्रमाणें माधरावसाहेब कर्नाटकांतून यश मिळवून परत येतात तों दादासाहेब आपली अपेशी मूर्ति घेऊन परत आले.