मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

या दादासाहेबांच्या आग्रहावरून प्रथम दोनतीन वर्षांपर्यंत शिंदे घराण्याच्या सरदारीचा निकाल झाला नाहीं. दादासाहेबांच्या मनांतून ही सरदारी मानाजी काकडे या नांवाच्या एका शिंद्यांच्या लांबचे पण शूर नातेवाईकास द्यावी, असें होतें. यामुळें शा. शके १६८४-८५ पर्यंत (इ. स. १७६२।६३ पर्यंत ) या सरदारीचें घोंगडे तसेंच भिजत पडलें होतें. पुढें केदारजी व महादजी या उभयतांनीं जेव्हां चिंतोविठ्ठल ऊर्फ तात्या रायरीकराकडे संधान बांधिलें, एका किंवा अन्यरूपानें तात्यांच्या घरी २५००० रु. पोहोंचविले, शिंदेसंस्थानची कुल फडनीशी दिली, दादासाहेबांपुढें खासगत खर्चासाठी १ लाख रुपये ओतले, तेव्हां केदारजीस सरदारी मिळण्याचा संभव दिसूं लागला. पण ‘अंतस्थ’ देणें हा शिंद्यांचा मुख्य वशिला नव्हता. ते उभयतां-पण विशेषतः महादजी-पराक्रमी सरदार ! त्यांच्याकडे रजपुतान्यांतील मामलतींचा कारभार विल्हे लावण्याचें काम आलें होतें ते त्यांनीं सफाईनें पार पाडले. इ. स. १७६३ च्या मेच्या सुमारास जानोजी भोसल्याच्या मुलखावर स्वारी करण्याचा त्यांस हुकुम झाला होता. कारण भोसले या वेळीं निझामाच्या कच्छपी होते. महादजी खालीं उतरणार तों भोसले सावध होऊन पुनः मराठ्यांच्या कक्षेंत अंतःप्रविष्ट झाले. असो; शिंदे उज्जनी, नर्मदातीर वगैरे करून थेट गंगातीरीं आले व तेथें श्रीमंतांच्या व त्यांच्या गांठी पडल्या. याच वेळीं जनकोजी शिंद्याचा तोतया पुढें येऊन त्याचेंच कांहीं वेळ खुळ माजलें. शेवटीं तो 'थोरात' हें ठरलें ! पुढें श्री. नारोशंकर राजे बहादर यांनी महाप्रयत्न करून शिंद्यांची सरदारी उभी केली व आपण त्यांची दिवाणगिरी पत्करून नजराणा, दरबारखर्च इत्यादिकांची व्यवस्था लावण्यास आरंभ केला. राजेबहादर यांनी शिंद्यांसाठीं आपल्या जामीनकीवर कर्ज काढून शिंद्यांची ६४ च्या ज्यान्युआरीमध्यें उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली आणि आपण माधवरावसाहेबांच्या कर्नाटकच्या स्वारीत सामील झाले.

हिंदुस्थानांत जातांना शिंद्यांच्या बरोबर महादेव गोविंद काकडे या नांवाचे दादासाहेबांच्या व रायरीकरांच्या प्रीतींतले एक श्रीमान गृहस्थ व मोरोविठ्ठल रायरीकर-तात्यांचे बंधु-पेशव्यांनी दिले होते. सरासरी वर्षसव्वाबर्षपर्यंत शिंदे व काकडे-रायरीकरांची जोडी. यांनी कसाबसा कारभार करून उदेपूर वगैरे मामलतींचा निकाल काढिला. पण उभयतांची चित्तशुद्धि नव्हती. १७६५ च्या मे अव्यलीस तर ही चुरस विकोपास गेली व माहदाजी गोविंद निराळे झाले. काकड्यास शिंद्यांची दिवाणगिरी हवी होती. ही गोष्ट नारोशंकरास (नानांस) कशी सहन होणार ! त्यांनीं शिंद्यांस सूचक पत्रें लिहिलीं. तेव्हां नारोशंकरांच्या ह्या सूचनेनुसार राघोराम, राघोमल्हार व बाजी नरसिंह (शिंद्यांचे हितचिंतक ) यांनीं काकड्यास धरण्याच्या हेतूनें त्यांच्यावर हल्ला केला तों काकडें युद्धांत मारिले गेले ! त्यांचा एक मुलगाही जखमी झाला. मोरोपंतांसही शिंद्यांच्या बाईनें हाकून दिलें !

याच सुमारास पेशवे व दादासाहेब कर्नाटकची स्वारी आटपून परत आले. चुलता-पुतण्यांत वांटणीच्या गोष्टीचा ऊहापोह झाला. पण रावसाहेबांच्या युक्तिशुद्ध बोलण्यापुढें भोळ्या राघोबाचें कांहीं चाललें नाहीं. पुनः ते उभयतां एकमतानें वांगू लागले. दादासाहेबांनीं हिंदुस्थानांत जाऊन पातशाहीचा बंदोबस्त करण्याचें व पानिपतच्या पूर्वी उत्तर हिंदुस्थानांत मराठ्यांचा जितका अमली मुलुख होता तितका पुनः सोडविण्याचें कबूल केलें. उभयतां श्रीमंतांनी भोसल्यास वठणीला आणिले आणि मग १७६६ च्या ज्यान्युआरींत दादासाहेब भोसल्यांची चार पांच हजार फौज घेऊन व विठ्ठल शिवदेव, गायकवाड इत्यादि सरदार घेऊन रायरीकरांसह उत्तरेस गेले.