मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

विषयप्रवेश.

पुढील श्री. रायरीकर यांचे संग्रहांतील पत्रें रा. रा. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांस श्रीमंतांच्या कृपेनें सांपडलीं. या रायरीकरांच्या घराण्याचा मान पेशवाईतील उत्तरार्धात पुष्कळच मोठा होता. इ. स. १७६०-१७७४ ( शके १६८२-१६९६ ) पर्यंत पेशव्यांच्या दरबारांत जे काय पुण्यास कारभार झाले, त्यांत चिंतो विठ्ठल रायरीकरांचे अंग नव्हतें, असें झालेच नाहीं. या तात्या रायरीकरांवर दादासाहेबांची अखंड कृपा असे व तेही दादासाहेबांच्या पक्षाला एकनिष्ठ असत.

असो; यापेक्षां आणखी पुष्कळ पत्रसंग्रह श्री. रायरीकरांकडे असावा. रायरीकर संग्रहांतील आज मी जो पत्रव्यवहार छापीत आहें, तो फक्त श्री. थोरले माधवरावसाहेब यांच्या आमदानींतींल आहे. त्यांतही प्रथमतः शिंदे प्रकरण घेतलें आहे. अर्थातच सर्व पत्रांचा अनुक्रम कालमर्यादेनें ठेवितां आला नाहीं व येणें शक्य नाहीं. शिंदेप्रकरणांत कालानुक्रम राहील; पण एकंदर सर्व पत्रें कालकमानें न छापितां मिळालेलीं पत्रें प्रकरणवार लावून प्रत्येक प्रकरणांत मात्र कालानुक्रम ठेवावा, असें मी ठरविले आहे. प्रत्येक पत्राला पत्रांक, सालासह महिन्याची मित्ती व सनासह महिन्याची तारीख देणार आहें व प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी त्या प्रकरणीचा गोषवारा व इतर अवश्य माहिती देणार आहें, वगैरे गोष्टी प्रसिद्ध झालेल्या जाहीर विनंतीपत्रांत नमूद केल्याच आहेत.

आतां शिंदे प्रकरणाचा विचार मला मिळालेल्या रायरीकरांचें पत्रान्वयें करावयाचा. सर्व मराठी इतिहासाच्या भक्तांस विदितच आहे कीं, पानिपतच्या घोर व घातकी संग्रामांत इतर सरदारी घराण्याबरोबर शिंद्याच्या घराण्याचा भयंकर नाश झाला दत्ताजी व जनकोजीच्या मागे शिंदे घराण्याची फारच हलाखी झाली. राणोजी शिंद्याचा नातु केदारजी व त्याचा रक्षापुत्र महादजी ( पुढें जगप्रसिद्ध झालेले पाटिलबावा ) हे कायते म्हणण्यासारखे पुरुष अवशिष्ट होते. पानिपतानंतर सर्व महाराष्ट्राची सत्ता आमच्या शूर पण भोळ्या दादासाहेबांच्या हातांत आली. त्या वेळचे लोक यांस ‘सांब’ म्हणत असत. चमत्कार हा आहे कीं, यास उपासनाही शंकराची असे! अथवा ‘यो यच्छूद्धः स एव सः’ या न्यायानें हें ठीकच होतें. दादासाहेब जितके शूर होते, तितकेंच जर बुद्धीचे खंबीर व लेखणीचे धड असते, आनंदीबाई, बापू, रायरीकर, राजेबहाद्दर, मल्हारराव होळकर, इत्यादि मंडळी सांगतील तेंच खरें व नानासाहेबांच्या पक्षाची राष्ट्राभिमानी मंडळी सांगतात तें खोटें, असा जर यांनी आपला पूर्वग्रह करून घेतला नसता, हे जर भोळे नसते, तर मराठी राज्यास सकुटूंब सपरिवार यांनीं जो कायमचासा अपाय केला, तो त्यांच्या हांतून झाला नसता. असो; यांचा भोळेपणा, यांचा तापट स्वभाव, यांची महत्वाकांक्षा, यांची बाहेरख्याली व यांच्या शूरत्वामुळें यांस ओघानें प्राप्त झालेली यांची मान्यता, हींच महाराष्ट्राच्या मुळावर येऊन त्यांनीं पेशवाईचा विध्वंस केला, ही गोष्ट मात्र खरी आहे.