समग्र राजवाडे साहित्याचे संकेतस्थळ म्हंटले की इतिहासाचार्य राजवाड्यांचे जे जे म्हणून लिखाण झाले ते सर्व त्यावर येणार हे स्पष्टच आहे. राजवाड्यांचे साहित्य बहुआयामी आहे. त्यांचे लेखन आणि संशोधन कर्तृत्व केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही. राजवाड्यांच्या लेखनाची समग्रता समजून घेताना त्या समग्रतेत येणारे खालील विविध विषय आणि प्रकार यावर कटाक्ष टाकायला हवा.

राजवाड्यांच्या लेखनाचा परीघ

१) आत्मचरित्रविषयक लेखन
राजवाड्यांचे स्वतःचे एक सलग असे आत्मचरित्र प्रकाशित झालेले नाही. मात्र, त्यांनी वेळोवेळी आपले अनुभव आणि आठवणी वेगवेगळ्या वेळी लहानमोठ्या लेखांच्या किंवा टिपणांच्या स्वरूपात लिहील्या आहेत. त्या खेरीज राजवाड्यांनी लिहीलेली पत्रे देखील त्यांच्या आत्मकथनाची भूमिका काही प्रमाणात बजावताना दिसतात. राजवाड्यांच्या आठवणींचा काळ अगदी त्यांच्या बालवयापासून सुरू होतो, तो अगदी त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत त्याचा अवधी पसरलेला आहे.

२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने
‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या शीर्षकाचे एकूण २१ खंड राजवाड्यांनी लिहीले. पहिला खंड १८९९ मध्ये प्रकाशित झाला आणि त्यानंतर सरासरी दीड वर्षांच्या अंतराने पुढले खंड येत गेले. शेवटचा २१ वा खंड यायला १९१८ साल उजाडावे लागले. म्हणजेच १८९९ ते १९१८ ही सुमारे वीस वर्षे राजवाडे मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित खंडांच्या प्रकाशनावर काम करीत होते. एकीकडे पुरावे, कागदपत्रे गोळा करण्यासाठी संपर्क, गाठीभेटी, प्रवास चालला होता, तर दुसरीकडे खंडाची पाने उभी रहात छपाई होत होती. १८९९ मध्ये राजवाड्यांचे वय ३५ वर्षांचे होते. त्या अगोदर किमान दहा वर्षे म्हणजे वयाच्या पंचविशीपासून ते मराठ्यांच्या इतिहासाला भिडले होते.

इतिहास लिहीण्यापूर्वी तो लिहीण्यासाठीचे कागदोपत्री व इतर साधनांचे (शिलालेख, ताम्रपत्रे वगैरे) पुरावे गोळा करायला हवेत, व त्या आधारेच इतिहास लिहीणं शक्य आहे, अन्यथा नाही असा राजवाड्यांचा ठाम विश्वास होता. अगदी सुरूवातीचा अपवादा‍त्मक नगण्य काळ सोडला तर राजवाड्यांनी आयुष्यभर कोणताही व्यवसाय किंवा नोकरी केली नाही. त्यांच्या मागे कोणत्याही आर्थिक बळाची पार्श्वभूमी नव्हती. अशा चणचणीच्या आर्थिक स्थितीला तोंड देत राजवाड्यांनी भारतभर भ्रमंती केली. ती भ्रमंती मुख्यत्वे ऐतिहासिक व संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी होती. त्यासाठी त्यांना बराच खर्च येत असे. त्या व्यतिरिक्त जी कागदपत्रे, पोथ्या, ग्रंथ वगैरे ज्यांच्याकडे असत ते राजवाड्यांकडे त्याची किंमत मागत. त्यासाठीही त्यांना पैसा लागत असे. त्यांची ती आर्थिक गरज आणि त्यांचे उत्पन्न यांचे व्यस्त प्रमाण राजवाड्यांनी आयुष्यभर सोसले. त्यांनी जे लेख लिहीले, वा प्रदीर्घ लेखन केले त्यातून मिळणारा पैसा, आणि दानशूर व्यक्ती वा स्नेही किंवा परिचितांकडून मिळणारी देणगीवजा मदत त्यांची आर्थिक गरज पुरविण्यासाठी पुरेशी नसे. असं असतानाही राजवाड्यांनी सुमारे ५ लाख कागदपत्रे जमा केली. ती आज धुळे येथील राजवाडे संशोधन मंदिर ह्या संस्थेत जतन करण्यांत आली आहेत. 

राजवाड्यांनी जमविलेल्या मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित कागदपत्रांवर आधारित त्यांनी लिहीलेल्या टिपणांमधून ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ चे एकवीस खंड त्यातून प्रकाशित झाले. शिवाजी महाराजांचा काळ, पेशव्यांचा काळ व त्या काळातील विविध राजघराण्यांच्या वा कुटुंबांच्या बखरी, पत्रव्यवहार वगैरे ऐतिहासिक खजिना ज्यात आहे असे हे एकवीस खंड ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आले आहेत.

३) संस्कृत भाषेविषयीचे लिखाण
‘संस्कृत भाषेचा उलगडा’ हे एका ग्रंथाचा ऐवज होईल इतके सलग लिखाण राजवाड्यांनी केले आहे. राजवाड्यांनी काही पत्रे म.म.दत्तो वामन पोतदार यांना संस्कृत मधून लिहीलेली आढळतात. अभ्यासकांसाठी ‘संस्कृत भाषेचा उलगडा’ हा ग्रंथ व उपलब्ध झालेल्या संस्कृत पत्रांचा समावेश ह्या संकेतस्थळात करण्यांत आला आहे.

४) मराठी भाषेविषयीचे लिखाण
मराठी भाषेतील धातूंचा कोश, विविध व्युत्पत्तिंचे कोश, आणि व्याकरणाच्या विविध अंगांविषयीचे राजवाड्यांचे अक्षरशः शेकडो पाने भरतील इतक्या लेखांचे संकलन आजपर्यंत विविध व्यक्ती व संस्थांनी केले आहे. उपलब्ध झालेले मराठी भाषा विषयक हे सर्व कोश व लेख ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आले आहेत.

५) समाजशास्त्रीय राजकीय विषयांसंबंधीचे लेखन
‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ ह्या राजवाड्यांच्या पुस्तकात इतिहासाच्या बरोबरीने समाजशास्त्रीय विश्लेषण आढळते. राजवाड्यांनी तात्कालिक राजकारणावर टीकात्मक लेखन केले आहे. उदाहरणार्थ, नामदार गोपाळ कृष्ण गोखले ब्रिटिशांशी चर्चा करण्यासाठी इंग्लंडला गेल्यानंतर राजवाड्यांनी ‘गोखल्यांची इंग्लंडांतील कामगिरी’ नावाचा लेख ‘विश्ववृत्त’ मासिकात लिहिला. राजवाडे लिहितात, ‘कित्येक लोक तर असेही बोलतात की, सयाजीराव गायकवाडाप्रमाणे विलायतेस जाण्याची गोखल्यांना चटक लागली इतकेच. बाकी त्यांच्या जाण्यांत काही विशेष मतलब नाही, आणि यदाकदाचित काही मतलब असला तरी विशेष हांशील नाही, निदान फलप्राप्ति तरी काही एक होणार नाही. आणि काही झालीच तर ती कटुफळाची होईल, गोडाची होणार नाही.’
राजवाड्यांनी गोखल्यांवर केलेली वरील टीका म्हणजे अतिशय सडेतोड व परखड भाष्य आहे. खरं तर तो लेख एखाद्या अग्रलेखासारखा आहे. याचाच दुसरा अर्थ हा की राजवाडे यांनी प्रासंगिक लेखांतून अप्रत्यक्षपणे पत्रकारिता केली आहे. त्यांचे असे लेखही ह्या संकेतस्थळावर येत आहेत. राजवाड्यांनी त्यांचे लेख निरनिराळ्या नियतकालिकांमध्ये लिहिले. ते लेख एकत्र करून लेखसंग्रह प्रकाशित करण्याचे वेगवेगळे प्रयत्न पूर्वी झाले आहेत. असे लेखसंग्रहातून आलेले, व न आलेले लेख एकत्र करून विषयानुरूप वर्गीकरण करून ते ह्या संकेतस्थळावर देण्याचा प्रयत्न आहे. आजमितीस ते काम प्रगतीपथावर आहे.

६) राजवाड्यांचे साने गुरूजी लिखित चरित्र
राजवाड्यांच्या विद्वत्तेविषयी सानेगुरूजींच्या मनात एवढा आदर होता की राजवाड्यांचे संपूर्ण चरित्र त्यांनी पुस्तकरूपाने लिहिले. ते संपूर्ण चरित्र ह्या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. वाचकांना ते उद्बोधक वाटेल असा विश्वास वाटतो.

सर्च किंवा शोधाच्या सोयीचे महत्व
राजवाड्यांचे लेखन हे मूळात संशोधनात्मक आहे. इतिहासासारखा विषय त्यामागे असल्याने आजच्या संशोधकांना त्यांच्या कामासाठी असंख्य संदर्भ त्यात मिळतील. त्यासाठी संकेतस्थळावरील सर्चची सोय म्हणजे पर्वणी आहे. राजवाड्यांचे मौलिक लेखन आणि आजच्या तंत्रज्ञानाने दिलेली संदर्भ शोधण्याची सोय असा संगम ह्या संकेतस्थळावरच आढळेल.
राजवाड्यांचे लेखन प्रकाशित झाले याला आता १०० वर्षे होत आहेत. त्यावेळची पुस्तके, लेख आता शोधणे यासारखे अवघड आव्हान दुसरे नसेल. कित्येक ग्रंथालयांमध्ये वाळवी किंवा २६ जुलैचा पाऊस वगैरे कारणांमुळे मूळात पिवळी पडलेली पाने नष्ट झाली आहेत. त्यामुळे छापिल पानांचा शोध लागून ते साहित्य जसजसे उपलब्ध होत जाईल तसतशी त्याची भर संकेतस्थळावर पडत राहील. राजवाड्यांचे हे सारे लेखन युनिकोड स्वरूपात टाईप करून, व त्याचे मुद्रितशोधन करून उपलब्ध करताना त्रुटी राहिल्या आहेत. त्यांचे शुद्धिकरणही केले जात आहे. आपल्या निदर्शनास काही त्रुटी आल्यास, अथवा आपल्या काही सूचना असल्यास, कृपया संपर्कासाठी जो फॉर्म ह्या संकेतस्थळावर दिला आहे त्या माध्यमातून कळवावे अशी विनंती आहे.
धन्यवाद.