Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

उपनामव्युत्पत्तिकोश

५ पतंजलीचा हा पातानप्रस्थ शब्द हेमचंद्रानें आपल्या व्द्याश्रयमहाकाव्याच्या सोळाव्या सर्गाच्या तेविसाव्या श्लोकांत वातानुप्रस्थ अशा अपभ्रंशरूपानें योजिला आहे. प्रस्थपुरवहान्त व योषध जे सांकाश्य फाल्गुनीवह, नांदीपुरं व वातानुप्रस्थ शब्द सत्संबंधक सोदाहरणा व्याख्यानाच्या निमित्तानें हेमचंद्रानें वातानुप्रस्थ हा प्रस्थान्त शब्द उद्धरिला आहे. पतंजलीचा पातानप्रस्थ शब्द हेमचंद्राजवळील महाभाष्याच्या पोथींत वातानुप्रस्थ असा लिहिलेला असल्यामुळें हेमचंद्रानें तो भ्रष्ट पाठ उद्धरिला आहे, हें सांगावयाला नको. वातानुप्रस्थे भवः नृपः ब्राह्मणः वैश्य अथवा कोपि जनः वातानुप्रस्थकः । वातानुप्रस्थ ऊर्फ पातानप्रस्थ गांवांत किंवा प्रांतांत राहणार्‍या मनुष्याला वातानुप्रस्थक ऊर्फ पातानप्रस्थक म्हणत.

६ पातानप्रस्थ ह्या पतंजलिकालीन ग्रामनामाचा व प्रांतनामाचा पाआणपत्त पानपत असा सध्यां दिल्ली प्रांतांत व महाराष्ट्र देशांतील मराठी भाषेंत उच्चार प्रचलित आहे. ह्याचा अर्थ असा होतो कीं, हे पाताणे ऊर्फ पाठारे प्रभू लोक मूळचे पंजाबांतील पानपत तालुक्यांत राहणारे लोक होते. ते पंजाबांतील शुक्लयजुर्वेदी ब्राह्मणांबरोबर व क्षत्रियांबरोबर दक्षिणारण्यांत व विशेषतः कोंकण किनार्‍यास वसाहत करण्यास आले. केव्हां आले त्याचाही स्थूल अंदाज करतां येतो. शकाच्या अकराव्या शतकांत झालेल्या अनहिलपट्टणच्या हेमचंद्राला वातानुप्रस्थ असा उच्चार माहीत होता. ह्या वातानुप्रस्थ शब्दाचा अपभ्रंश बाताणे, बाआणे, बाणे असा झाला असता, पाताणे असा झाला नसतां; सबब पाताणे लोक हेमचंद्राच्या वेळीं म्हणजे शक अकराशेंत अनहिलपट्टणाहून कोंकणांत उतरले असल्याचा संभव नाहीं व हे लोक अनहिलवाड प्रांतांतील मूळचे राहणारे नव्हत. हे लोक ज्याप्रमाणें शक अकराशेंच्या सुमारास अनहिलवाड प्रांतांतून कोंकणांत उतरले असण्याचा संभव नाहीं, त्याप्रमाणेंच महाराष्ट्री भाषा ज्या कालीं महाराष्ट्रांत जिवंत बोलत असत त्या कालींहि उतरले असण्याचा संभव नाही. महाराष्ट्रींत पातानप्रस्थ ह्या शब्दाचें रूपांतर पाआणपठ्ठ असें होऊन तद्वारां मराठींत पाणपाठ असें रूप निपजलें असतें. तसा अपभ्रंश ज्या अर्थी मराठींत झालेला नाहीं, पाताण असा अपभ्रंश झालेला आहे, त्या अर्थी महाराष्ट्रांत महाराष्ट्री भाषा बोलली जात असतां हे लोक कोंकणांत उतरले असल्याचा संभव नाहीं. म्हणजे शकपूर्व २०० पासून शकोत्तर ११०० पर्यंतच्या अवधीत हे लोक महाराष्ट्रांत व कोंकणांत उतरले नाहींत. पातान ह्या संस्कृत शब्दाचा पाताण असा अपभ्रंश चंड ज्या प्राकृत भाषेचें व्याकरण देतो व ज्याला आर्य प्राकृत म्हणून सोईखातर कित्येक यूरोपियन नांव देतात, ती आर्य प्राकृत भाषा प्रचलित असतां म्हणजे शकपूर्व २०० च्या पूर्वी किंवा सुमारास हे लोक कोंकणांत उतरले असले पाहिजेत. त्या कालीं ह्या लोकांना पातानकाः व प्रस्थाहारकाः ह्या संज्ञा पडून त्यांचीं आर्य प्राकृत रूपें पाताणे व पाठारे अशीं त्या काळीं प्रचलित झालीं.
( रा. ले. सं. भा. २ )