लेखांक २७.

श्री.
१६२५ पौष शुध्द १५

'' आज्ञापत्र समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री शंकराजी पंडित सचिव ताहा मोकदमानि देहाय त॥ गुंजनमावळ सुहुरसन अर्बा मया अलफ. मा। संताजीराऊ सिलंबकर देशमुख ता। मजकूर यास वतनमुळें राजगड नामजाद ठेविले होते. त्यास पादशाही मोर्च्यावरी सुवेळेस स्वामिकार्यावरी खर्च जाले. त्याचे पुत्र प्रतापजी हैबतराऊ सिलबकर आहेत. त्याचे वय लाहान आहे. पोख्ते होती तोवरी संताजीराऊ याची स्त्री गोदाबाई देशमुखीचा कारभार करितील; तरी तुह्मी त्यांचे आज्ञेत राहोन वर्तत जाणे. छ. १३ रमजान सुरू सूद.''

लेखांक २८.

श्री.
१६२५ पौष शुध्द १५

'' अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री शामजी हरी
नामजाद व कारकून वर्तमान व भावी सुभा मावळ गोसावीयासि :-

सेवक शंकराजी नारायण सचिव नमस्कार सुहुरसन अर्बा मया व अलफ म। संताजीराऊ सिलंबकर देशमुख ता। गुंजनमावळ यास राजगडी वतनामुळे ठेविले होते. त्यास पातशाही मोर्च्यावरी सुवेळेस स्वामिकार्यावरी खर्च जाले. अशाच त्यांची स्त्री गोदाबाई यांची साडीचोळी चालिली पाहिजे. याकरितां यांस साडीचोळीची मोईन सालीना हान पा। १०० एकचे रास केले असेत. जोपर्यंत गोदाबाई जिवंत आहे तोपर्यंत साल दरसाल पावीत जाणे. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे. या पत्राची तालिक लेहोन घेऊन असल पत्र गोदाबाईजवळी भोगवटियासि फिराऊन देणे. छ १३ रमजान सुरूसूद बार पे॥ छ॥ २१ मिनहू.''