प्रस्तावना
(१६) पुणें ते नागपूर - पुणें, औरंगाबाद, दाभाडी, जाफराबाद, बाळापूर, अलजपूर, नागपूर.
(१७) पुणें ते धारूर - पुणें, गारपीर, थेऊर, करखंब, साळूमाळूचें पांरगांव, वाळकी, मांडवगण, आडळगांव, भोसेगांव, सिंगवी, फकराबादधानोरें, बारशी, खर्डे, पानगांव, गारदौंड, पेडगांव, परिंडा, बीड, धारूर.
(१८) पुणें ते भागानगर - पुणें, सुपें, बारामती, तुळजापूर, कल्याण, बेदर, भालकी, उदगीर, गोवळकोंडा, भागानगर.
पुण्याहून फुटणा-या मोठमोठ्या मार्गांपैकी कांहींचा हा ठोकळ तपशील आहे. ह्या मार्गांवरून माणसें, बैल, घोडीं, उटें, हत्ती, पालख्या, मेणे वगैरे वाहनांचा रिघाव यथास्थित होत असे. माकाडामानें १७८० च्या पुढें शोधून काढिलेली खडीच्या सडका करण्याची युक्ति मराठ्यांना त्यावेळीं म्हणजे १७६० त माहीत नव्हती हें सांगावयाला नकोच. परंतु त्यावेळच्या इंग्लंडांतील व युरोपांतील रस्त्यांची स्थिति लक्ष्यांत आणिलीं असतां हिंदुस्थानांतील रस्ते उत्तम होते असेंच म्हणावें लागतें. पेशव्यांच्या राज्यांत सरकारी डाकेचा कारखाना मोठा असे. सरकारी डाकेबरोबरच खासगी लोकांचींहि पत्रे जात असत. डाकेच्या व रस्त्याच्या बाबींत १७६० त युरोपखंड हिंदुस्थानाच्या फारसें पुढें होतें असें नाहीं. सरकारी डाकेपेक्षां सावकारी डाक जलद पोहोंचत असे. सध्यांच्यापेक्षां त्यावेळीं महाराष्ट्रांतील लोक भरतखंडाच्या सर्व प्रांतांत जास्त प्रवास करीत असत. कोंकणकिना-यानें गलबतांतूनहि सफरी कोंकणांतील लोकांस कराव्या लागत. द्वारकेपासून गोकर्णापर्यंत तराडी व महागि-या सारख्या चालूं असत. परंतु किनारा सोडून पांच पंचवीस कोसांच्या पलीकडे जाण्यास मराठी तारवें फारशीं धजत नसत.