[२५४] ।। श्री ।। २९ सप्टेंबर १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावी यांसः
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. बद्दल देणें राजश्री नारो शंकर यांस पथकास समजावीस नालबंदीचे ऐवजापैकीं रुपये १००००० येकून एक लक्ष रुपये तुह्यांकडून देविले असेत. तरी प्रांत बुंदेलखंड वगैरे महाल येथील ऐवजीं कार्तिक मार्गशीर्ष दोन महिन्यांत पावते करून पावलियाचें कबज घेणें. जाणिजे. छ १९ सफर, सु।। इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.