प्रस्तावना

विवेचन दहावें.

सतराव्या व अठराव्या शतकांत महाराष्ट्रांतील लोकांच्या अंगीं स्थितीपेक्षां गतीचेंच प्राबल्य विशेष होतें. पावसाळ्याचे चार महिने खेरीजकरून बाकीचे आठ महिने मराठे पुण्याहून दाही दिशांभर पसरत असत. अठराव्या शतकांत मराठ्यांच्या गतीचें मुख्य केंद्र पुणें शहर होतें. मुसुलमानांच्या कारकीर्दीतहि पुण्याचें ठिकाण मोहिमांची सुरुवात करण्यास सोईचें समजलें जात असे व त्याच्या ह्या सोयीस्कर स्थानावरून त्यांनीं त्याला मोहिमाबाद असे अन्वर्थक नांव दिलें होते. सातारा व सासवड हीं स्थलें सोडून पेशव्यांनीं आपलें ठाणें पुण्यास दिलें त्याचें तरी मुख्य कारण हेंच. हिंदुस्थानांत, कोंकणांत, गुजराथेंत, श्रीरंगपट्टणास व निजामाच्या राज्यांत जाण्यास पुण्याच्या मैदानांतून अनेक रस्ते फुटतात. त्यांपैकीं कांहीं मुख्य मुख्य मार्गाचा व मुक्कामांचा येथें तपशील देतों.

(१) पुणें ते नाशीक - पुणें, भांबुरी, भोसरी, मोसें, चाकण, खेड, पेठ, लिंगदेव, भोगूर, गोवर्धन, त्रिंबक, नाशीक.
(२) पुणें ते वसई, ठाणें, पनवेल - पुणें, पुनावळें, तळेगांव, नाणें, माहू, कुसूरघाट, भिऊपुरी बैजनाथ, नासरापूर, दहिवली, बदलापूर, कल्याण, वसई, परशीत, ठाणें, तळेगांव, वडगांव, कार्ले,                                               बोरघाट, खालापूर, पनवेल, मुंबई.
(३) पुणें ते नागोठणें - पुणें, भांबुर्डे, मुळशी, भोरकस, भोरप, पाली, नागोठणें, अलीबाग, चौक, रेवदंडा.
(४) पुणें ते रायगड - पुणें, खडकवासलें, खांमगांव, पाद्र्याचा घाट, येल्याची पेठ, बोचाघोळी, रायगड, महाड, तळें, घोसाळें, गावेल, श्रीवर्धन, बाणकोट.
(५) पुणें ते वाई – पुणें, कात्रज, शिवापूर, भोर, अंबेडखिंड, वाई, बावधन, सातारा.