[२४९] ।। श्री ।। २४ सप्टेंबर १७६०.
श्रियासह चिरंजीव र।। बाबा व गंगाधरा प्रती गोविंद बल्लाळ आशीर्वाद उपरि. तुह्मीं पत्र जासुदासमागमें पाठवलें तें पावलें. त्यास, तुह्मीं चिंरजीव गंगाधरास रायपुरीं ठेवून तुह्मी वतीस३११ घेऊन पत्रदर्शनीं आह्मांजवळ लष्करीं येणें. तदनंतर आह्मी समागमें येऊन. वरचेवर स्नान करून येऊन. जर येणें तर येथें द्वितीयेच्या पक्षास येणें. ह्मणजे पक्ष करून गंगास्नानहि करून येऊन. गुलोलीं आज शनवारीं मध्यरात्रीं धर्मद्वार मागोन निघोन गेले. दोन गढी आणीक सुटली. दोन राहिली तेहि आज सुटतील. तुह्मीं लिहिलें कीं कपिलाषष्ठीस स्नानास यावें ह्मणोनं दोन चिट्टिया लिहिल्या त्यास, चिरंजीव गंगाधरास व मुलीस ठेवून तुह्मीं बायकांस घेऊन बहुत जलद पत्र पावतांच येणें. एक घडीचा विलंब न करणें. भेटीनंतर सविस्तर बोलोन. तुह्यांकरिता येथें आह्मीं मुकाम केला आहे. सत्वर येणें. उद्या पत्र पावेल तेंच क्षणीं येणें. दोन राहुटिया लहान लहानशी घेऊन येणें. चार कनाता घेऊन येणें. एक शेतखाना, भांडीं अगत्य अगत्य घेऊन येणें. विलंब न करणें. मित्ती भादो शुद्ध ११. हे आशीर्वाद. मोहरा दहापंधरा घेऊन येणें. हे आशीर्वाद. तुह्मांसहि पत्र जासुदासमागमें प॥ तें पावलेंच असेल. पत्र पावतांच तुह्मीं स्वार होऊन येणें. हे विनंति. रा. रामचंद्रभटजी सुखरूप आह्माजवळ पावले. हे विनंति. पत्र पावतांच निघोन येणें. नाहीं तर द्वितीयेस श्राद्ध आहे. त्यास येऊन तर विलंब लागेल. याजकरितां तुह्मीं येणें. पत्र पावतांच येणें. हे आशीर्वाद.