प्रस्तावना

अष्टप्रधानांची संख्या शिवाजीच्या पुढें आठच नव्हती हें ह्या दोन आधारांवरून सिद्ध आहे, व तोच प्रकार शिवाजीच्या वेळींहि होता, हें ४०४ पत्रावरून उघड आहे. हा वाद आठ ह्या संख्येपुरताच आहे. बाकी शिवाजीची राज्यपद्धति (अष्ट) प्रधानात्मक होती हा सिद्धांत साधार आहे हें निर्विवाद आहे. (ब) आतां ही राज्यपद्धति शिवाजीनें अजिबात नवीन शोधून काढिली किंवा मुसुलमानापासून घेतली किंवा पूर्वीच्या संस्कृत नीतिशास्त्रांतून घेतली ? माझ्या मतें शिवाजीनें ही राज्यपद्धति मुसुलमानांपासून घेतली. पेशवा, मुजुमदार, वाकनीस, सुरनीस, डबीर वगैरे अधिका-यांचीं नावें मुसुलमानांच्या दरबारांतील आहेत. त्यांना मुख्य प्रधान, अमात्य, मंत्री, सचिव, सुमंत वगैरे संस्कृत नांवे शिवाजीनें दिलीं. बाकी शिवाजीची पद्धति मुसुलमानांच्या पद्धतीचेंच हुबेहुब अनुकरण होतें. (क) ही अष्टप्रधानात्मक पद्धत प्रस्तुतच्या युरोपांतील क्याबिनेट पद्धतीप्रमाणें तर नव्हतीच; परंतु, सतराव्या शतकांतील यूरोपांतील कित्येक देशांतील क्याबिनेट पद्धतीप्रमाणें ती कांहींशी होती. शिवाजीच्या पद्धतींत व सतराव्या शतकांतील युरोपियन पद्धतींत अंतर असें आहे कीं शिवाजीचे न्यायाधीश व पंडितराव ह्या दोन प्रधानांखेरीज बाकीचे सर्व प्रधान लढाया करीत व युरोपांतील प्रधानांना हा शिपायगिरीचा धंदा बहुश: माहीत नसे. सारांश, शिवाजीच्या प्रधानमंडळींचे साम्य युरोपांतील कोणत्याहि शतकांतील क्याबिनेटशीं नाहीं. शिवाजीनें केवळ मुसुलमानांचा कित्ता गिरविलेला आहे. तेव्हां ह्या क्लृप्तींत सूचित होणारी (ब) आणि (क) हीं कलमें पूर्वग्रहात्मक होत हें उघड आहे. सत्यासत्य पद्धतींची भेसळ होते ती ही अशी होते. ह्या भेसळीला फार जपलें पाहिजे. (५) उपमान प्रमाणावा कोणताहि सिद्धांत ठरवूं नये. हीं पांच कलमें लक्ष्यांत ठेवून इतिहासरचना केली असतां ती सन्मान्य होईंल ह्यांत संशय नाहीं. मराठ्यांच्या राष्ट्राच्या जीवनचरित्राचा अभ्यास अनेक दिशांनी केला पाहिजे. (१) मराठ्यांचा सामाजिक इतिहास, (२) मराठ्यांचा राजकीय इतिहास, (३) मराठ्यांच्या धर्माचा इतिहास, (४) मराठ्यांच्या संस्कृतीचा इतिहास, (५) मराठ्यांचा भाषेचा इतिहास, (६) मराठ्यांच्या मोहिमांचा इतिहास, (७) मराठ्यांच्या लष्कराचा इतिहास, (८) मराठ्यांच्या आरमाराचा इतिहास, (९) मराठ्यांच्या कायदेकानूंचा इतिहास, (१०) मराठ्यांच्या किल्ल्यांचा इतिहास, (११) मराठ्याच्या जमीनमहसुलाचा इतिहास वगैरे शाखांचा सशास्त्र व सोपपत्तिक असा अभ्यास झाला पाहिजे. मराठ्यांच्या राजकीय इतिहासाचा सध्यां येथें विचार चालला आहे, तेव्हां त्याचे विभाग सशास्त्र किती करितां येतील तें स्थूलमानानें सागतों. (१) इ.स १६४६ पर्यंत शिवाजीच्या पूर्वीचा इतिहास. (२) १६४६ पासून १६८० पर्यंतचा स्वातंत्र्यार्थ लढाईचा इतिहास. (३) १६८० पासून १७०७ पर्यंतच्या स्वातंत्र्यार्थ लढाईच्या शेपटाचा इतिहास. (४) १७०७ पासून १७३१ पर्यंतचा स्वराज्यस्थापनेचा व हिंदुपदबादशाहीचा इतिहास. (५) १७३१ पासून १७६१ पर्यंतचा ब्राह्मणपदबादशाहीचा इतिहास. (६) १७६१ पासून १७९६ पर्यंतचा ब्राह्मणपदबादशाहीच्या जगवणुकेचा इतिहास. (७) १७९६ पासून १८१८ पर्यंतचा महाराष्ट्रसाम्राज्याच्या -हासाचा इतिहास. (८) १८१८ पासून १८९८ पर्यंतचा महाराष्ट्राच्या अवनतीचा इतिहास. मराठ्यांच्या इतिहासाच्या ह्या विभागांबरोबर महाराष्ट्राच्या भूज्ञानाचाहि अभ्यास झाला पाहिजे.