प्रस्तावना
विवेचन नववें.
पहिल्या विवेचनांत ग्रांट् डफ् च्या पद्धतीचा किंवा पद्धतीच्या अभावाचा विचार करून मराठ्यांचा इतिहास भौतिक व आत्मिक अशा दोन्ही पद्धतींनीं लिहिला असता सर्वांगांनीं संपूर्ण होईल म्हणून सांगितलें आहे. हा सर्वांगांनीं संपूर्ण असा इतिहास लिहावयाचा म्हटला म्हणजे अगोदर नानातन्हेची तयारी झाली पाहिजे. प्रथम धर्म, नीति, विद्या, समाज, व्यापार, कृषि, कलाकौशल्य, कायदेकानू, राजकारण, मोहिमा वगैरे, प्रकरणासंबंधीं अस्सल कागदपत्र शुद्ध छापले गेले पाहिजेत. त्यांवरून त्या त्या प्रकरणांतील प्रसंगांचा कालनिर्णय केला पाहिजे व नंतर मराठ्यांच्या इतिहासाची इमारत रचण्यात हात घातला पाहिजे. ही पूर्वीची मेहनत होण्याच्या अगोदर मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला असतां तो नानात-हेनें अपूर्ण व अविश्वसनीय होण्याची बहुतेक खात्री आहे. आजपर्यंत मराठ्यांचा इतिहास आपआपल्या मतीप्रमाणें संपूर्ण अथवा अंशत: लिहिण्याचा प्रयत्न कांहीं लोकांनीं केला आहे. शिवाजी, संभाजी, शाहू, बाजीराव, नाना फडणिस, हरिपंत फडके, परशुराम भाऊ पटवर्धन, बापू गोखले, अहिल्याबाईं होळकर, मल्हाराराव होळकर, गोंविंदपंत बुंदेले, महादजी शिंदे, रामदासस्वामी, जयरामस्वामी, वगैरें ऐतिहासिक पुरुषांचीं चरित्रें आजपर्यंत छापून प्रसिद्ध झालीं आहेत. तसेच मराठ्यांच्या समग्र चरित्राचे इतिहासहि कित्येक बाहेर पडले आहेत. परंतु, ह्या चरित्रांपैकीं व इतिहासांपैकीं फारच थोड्यांत ऐतिहासिक शोध करून व्यवस्थित रीतीनें प्रसंगांच्या व पुरुषांच्या महत्त्वाप्रमाणें लिहिण्याचा प्रयत्न केलेला दृष्टीस पडतो. जी कांहीं इतिहासाचीं साधनें आजपर्यंत छापलीं गेलीं आहेत त्यांच्या आधारावर हीं पुस्तकें तयार केलेलीं आहेत. आजपर्यंत मिळालेलीं साधनें कामाला पुरेशीं आहेत अशी बहुतेक ग्रंथकारांची तृप्ति झालेली दिसते. बखरींतून सांपडणारा मजकूर ग्रांटड्फच्या ग्रंथांतून सांपडणारा आहे; तेव्हां तो ग्रंथकार सर्वस्वीं विश्वसनीय आहे असाहि कित्येकांचा ठाम ग्रह झालेला वाचण्यांत येतो (लक्ष्मणराव चिपळोणकरकृत मराठ्यांचा इतिहास, प्रस्तावना). ग्रांटडफ्च्या ग्रंथांतून मिळणा-या माहितीपेक्षां जास्त माहिती काव्येतिहाससंग्रहांतील पत्रांत आली असून डफ्च्या ग्रंथांत बहुतेक सर्व महत्त्वाच्या गोष्टी आल्या आहेत इतकेंच नव्हें, तर कित्येकांचा बारीक पाल्हाळहि त्यानें केला आहे असेंहि एका ग्रंथकाराचें म्हणणें आहे (नातूकृत महादजीचें चरित्र, प्रस्तावना).