[२४४]                                      ।। श्री ।।            १८ सप्टेंबर १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः

पो।। सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. अलीकडे तुमचें पत्र येत नाहीं, तरी सविस्तर लेहून पाठवणें. इकडील वर्तमान कांहीं अधिकोत्तर ल्याहावे ऐसें नाहीं. तुह्मांस पेशजी एकदोन वेळा लिहिलें होतें जे तुह्मी फौजसुद्धां गंगाकिनारा सोरबच्या घाटाजवळ जाऊन राहाणें. पलीकडे रोहिले सुजातदौलाच्या मुलकांत उतरावयाची आवाई घालणें. तिकडे गडबड करणें. बुणगे उमरगडीं टाकून सडी दौड लांबलांब करावी. रसद अबदालीच्या लष्करास जाते ती लागभाग पाहून मारावी, लुटावी. पलीकडील जमीदारांस कुल बीर देऊन हातीं घ्यावें. त्याजकडून उपद्रव करवावा. येणेंप्रें॥ तुह्मास लिहिलें होतें. याअन्वयें तुह्मी व राजश्री गोपाळराव गणेश मिळोन तिकडे गेलां असालच व लिहिल्या डौलानें करीतहि असाल. कदाचित् नसिलां गेलां तरी याउपरि त-ही लौकर जाऊन सोरमच्या घाटास दाखल होणें, विलंब न लावणें. येविशीं गोपाळराव गणेश यांसहि लिहिलें आहे. ते तुह्मापाशीं फौजसुद्धां येतील. तुह्मींहि त्यांस लिहून आपणापाशीं आणणें आणि हें काम करणें. व जे लोक अबदालीकडील इकडच्या राजकारणानें निघोन येतील त्यांस तुह्मीं जागा देऊन ठेऊन घेणें. इकडे रवाना करणें ऐसेंहि पेशजी लिहिलें होतें. त्यावरी येथून कोण्ही तुमचे नावचीं पत्रें घेऊन गेले आहेत, तुह्यांस पत्र सरकारचें आणून देईल, त्यास जागा देऊन जमा करणें, इकडे पाठवणें. वर्तमान वरिचेवरी लिहीत जाणें. ऐवज पोख्ता जमा इतके दिवसांत तुह्मीं केलाच असेल. तरी सत्वर ऐवज पाठवणें. विलंब एकंदर न लावणें. + तुह्मी, गोपाळराव, जमीदार आठ दहा हजार जमा व्हाल. इकडे आणल्यास रान मोकळें पडेल. फारकरून माहालीं फौज राहून दोनतीन हजार येईल. तिकडे पेंच पडल्या माहालीं राहील फौज त्याच्यानें बंदोबस्तहि राहणार नाहीं. यास्तव तुह्मीं आपला तालुका मागें टाकून, राजे जमीदार जमा करून, सडे फौजेनें सोरमकडे येऊन, पलीकडे दौरत घालावी. जमीदार वगैरे पलीकडील फिसाद उठवावी. सादुल्ला, फैजुल्ला रोहिले यांकडे सूत्रहि करावें. फौजेचा दबाव दुपट पडेल. घरोघरचे येणार ते येणार नाहींत. बंगसहि लगाम लावील तर सलूख राखावा. येथून उठवून न्यावा. न येई तरी मुलूख मारावा. हें केलिया मोठें काम आहे. तुह्मीं आतां केवळ माहालकरी नव्हा. सरदारासारखी तुह्माब॥ फौज आहे. पांचसात हजार सडे फौजेनें रात्रंदिवस गनीमी करून रसद कुमक येईल ते मारावी. जाटांचेहि३१० जवळ कुमकेस आहेत. याप्रें॥ जालिया मोठे काम आहे. तरी जरूर करणें. ऐवज रवाना करणार तो सत्वर ग्वालेरीवरून येऊन पोहोचे, दोनचारशें राऊत शाहाणा माणूस पैक्याब॥ देऊन रवाना करणें. प्रस्तुत तुमचेच ऐवजाचा भरवसा आहे. र॥ छ ८ सफर. बहुत काय लिहिणें. हे विनंति.