[२४३]                                      ।। श्री ।।            ७ सप्टेंबर १७६०.

 राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंदपंत दाजी स्वामीचे सेवेसी:

पोष्य नारो शंकर कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम ता॥ छ २७ र॥वल पावेतों मुकाम इंद्रप्रस्थ कुशळरूप जाणून स्वकाय कुशळ लिहीत असलें पाहिजे. याउपरि श्रीमंत राजश्री भाऊसाहेबानीं आपणास पहिलीं पांच चार पत्रें पाठविलीं. सांप्रतहि मुजरद बहुत निकडीनें पत्र लिहिलें आहे. पत्रावलोकनीं साद्यंत कळेल. दाजीबा, आह्मांसहि आपण सत्वर येत नाहीं ह्मणोन बहुत प्रकारें लिहिलें आहे. अशा समयास आणीक सर्व कामें एकीकडे ठेवून रात्रीचा दिवस करून चाकरी करून दाखवावयाचा प्रसंग असतां, तुह्मीं यावयास ढील करितां, यावरून काय ह्मणावें ? पत्र पावतांच जेथें असाल तेथून कूच करून दुमजला येऊन पोहोंचणें. तुह्मापाशीं दहा हजार फौज असोन पंचवीस लाख रुपये खात असतां, खावंदांस कामाची निकड असतां तुह्मी लटके बहाणे करून मुलकांत रहावें हे गोष्टी तुह्मांस योग्य नाहीं. खावंद वारंवार लिहितात, तुह्मी गढी कोटाचे बहाणे लिहितां हा सेवक लोकांचा धर्म नव्हे. पत्र श्रीमंताचे पावतांच शिताबी करून येणें. प्रसंग उरकल्यावर आलेत तर काय कामाचे? + याउपर श्रीमंतांनीं आह्मांस रागें भरोन दोन चार पत्रीं तुह्माविषयीं लिहिलें कीं तुह्मीं त्यांस लेहून फौजा लौकर येऊन समयीं उपराळा होय तें करावें. तरी आपण या समयीं दरोबस्त फौजा व जमीदार समागमें घेऊन राजश्री गोपाळराऊ वगैरे त्याच प्रांतींचें श्रीमंतांचें अन्न खाऊन दौलत कमाविता. सर्वांनीं जमा होऊन सत्वर यावें. नाहीं तरी परिच्छिन्न शद्ब लागेल. श्रीमंताची व मोगलांची दो ती कोसांची तफावत. एकदोन रोजांत युद्ध तुंबळ होऊन श्रीस करणें तें होइल. परंतु श्रीमंतांचे हिमतीस तारफ कोठपर्यंत लिहावी ! सफेजंगीस कांहीं बाकी नाहीं. बुणगे कबीले सर्व बराबरच आहेत. ऐसें निवान आरंभिलें आहे. आह्मी किल्ले मजकूरचा बंदोबस्त करून दीड हजार फौजा मोगलाचे लश्करवर जबळ कनोजीस ठेवून घोडीं उंटें आणितात. व हजार स्वार प्यादा फार उतरोन धामधूम मांडिली. रसदहि बंद करविली आहे. ऐशा समयीं आपण फौजांसुद्धां आलिया श्रीमंतास बहुतच समाधान वाटले. जरूर रात्रीचा दिवस करून, लांब मजली करून लौकर लौकर येणें. विलंब न करणें. बहुत काय लि।।. हे विनंति.