प्रस्तावना
तसेंच, बाळाजी बाजीराव ज्या दिवशीं दिवंगत झाले त्या दिवशीं गार्द्याचा दंगा होणार होता (लेखांक २८६); त्यांत रघुनाथरावाचें व सखारामबापूचें अंग असावें असा संशय येतो. रघुनाथरावानें हा दंगा जागच्या जागीं जिरविला असें जरी पत्रांत लिहिलें आहे तत्रापि हीच गोष्ट रघुनाथरावाच्या विरुद्ध पुराव्याच्या रूपानें आणितां येण्याजोगी आहे. सखारामाची कारस्थानें अशींच भूल पाडणारीं असत. आपणच दंगा करवावयाचा, आपणच तो मोडण्याचें श्रेंय घ्यावयाचें व घटकेंत आपणच राजनिष्ठ बनावयाचे, हे सर्व खेळ सखारामाचे होत ! ह्यावेळची सखारामबापूचीं व रघुनाथरावाचीं पत्रें जर पुढें मागें कोठें सांपडलीं तर त्यांत ह्यासंबंधीं उल्लेख अवश्य निघेल असें भविष्य करून ठेवण्यास हरकत नाहीं. असो. सखारामाच्या कारस्थानानें गोविंदपंताच्या चिरंजीवांचा बचाव झाला, हाच संशय दृढ होतो. गोविंदपंताच्या विरुद्ध पुराव्याचीं पत्रें येरंड्यांनें जीं दडवून व लपवून वाई येथें आपल्या वाड्यांत ठेविलीं तीं हा कालपर्यंत कोणाच्या दृष्टीस पडलीं नाहींत. पेशव्यांच्याहि तीं दृष्टीस पडलीं नाहींत व ग्रांटडफच्याहि नाहींत. त्यामुळें गोविंदपंताचा संशय कोणालाच आला नाहीं. अर्थात् पानिपतच्या मोहिमेचें मुख्य सूत्र कोठें होतें व खरें स्वरूप काय होतें तेंहि आजपर्यंत कळलें नव्हतें. सध्यां ह्या ग्रंथांत छापलेल्या पत्रांच्या द्वारें ह्या स्वरूपाच्या कांहीं भागाचा उलगडा झाला आहे. राहिलेल्या भागांचा उलगडा, मल्हाररावाचा, रघुनाथरावदादाचा व सखाराम भगवंताचा ह्या वेळचा पत्रव्यवहार सांपडे तोंपर्यंत, व्हावयाचा नाहीं. (२१) रघुनाथरावदादाचें व सखारामबापूचें खरें स्वरूप बाहेर पडण्यास संधि मिळाली. सखारामबापूच्या सल्ल्यानें रघुनाथरावानें माधवरावांशी लढाई आरंभून राज्याधिकारी मिळविण्याचा प्रयत्न केला. सखाराम कलिपुरुष आहे अशी गोपाळराव पटवर्धनाची खात्री झालेली होती. परंतु, बाळाजी बाजीरावाचा सखारामावरती पूर्ण विश्वास होता. तो किती अस्थानीं होता हें पानिपतची लढाई झाल्यानंतर स्पष्टपणें कळून आलें.