[२३९] ।। श्री ।। ३ सप्टेंबर १७६०.
पुरवणी राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः
विनंति उपरि. यंदा तुह्मांकडील प्रांतांत दंगा जाहला, तो फार करून सरदारांकडीलच तालुकियांत. किरकोळी सरकारच्या तालुकियांत जाहला. सध्या तों तुह्मीं शत्रूकडील ठाणीं अमल उठवून आपलीं कायम केलीं. आतां लावणीचे दिवस रयतेस दिलासा देऊन तगाई देऊन लावणी या दिवसांत करावी, त्यास दिरंग दिसतो. बुंदेलखंडांत तो कांहींच पेंच नसता तिकडीलहि लावणी रयतेची दिलभरी नाहीं. यामुळें पुढें नुकसानी येणार, ऐशीं वर्तमानें येतात. त्यास तुह्मांसारिखे मुलखाची आबादी करावयास दुसरे कोण? तुह्मी बारगीर सरकार किफायत गैर किफायत समयासमयास चित्तांत आणून किफायतीचीं कामें करीत आलां पुढें त्याचप्रमाणें करावीं. ऐसें असोन तुह्मांकडील तालुकियांतील ऐशीं वर्तमानें यावीं उत्तम नाहीं. या उपरि बुंदेलखंड वगैरे आपल्या तालुकियांत तमाम रयतेची दिलभरी करून लावणी होय तें करणें. येविषयीं आपणांकडील तालुकदारांसहि वरचेवर ताकिदा लिहून पाठवून लावणी होऊन नुकसानी न ये तें करणें. या वर्तमानावरून असें दिसोन येतें कीं लावणीस कमती करून खावंदास तोटा३०८ दाखवावा. परंतु तुह्मी असे न व्हां. तुह्मांपासून सरकार नफाच व्हावा. मक्त्याचा मामला असोन ज्याप्रमाणें लावणी रयतेचा दिलासा करून पैसा साधतां मोठ्या खाजगत संसाराप्रमाणें चित्तांत आणून खावंद किफायत करावी. करणें. कोणे महालीं कशी तगाई देऊन लावणी केली हें तपशिलवार लिहून पाठविणें. रवाना छ २२ माहोरम बहुत काय लिहिणें हे विनंति.