प्रस्तावना
(२०) गोविंदपंताच्या पुत्रांना किंवा अनुयायांना पानपितच्या मोहिमेंत व लढाईंत कुचराई केल्याबद्दल कांहींएक प्रायश्चित मिळालें नाहीं. योग्य चाकरी न केल्यास पुढें लढाई झाल्यानंतर फार कठीण जाईल वगैरे धमकीचीं पत्रें सदाशिवरावानें गोविंदपंताला लिहिलीं होतीं. परंतु गोविंदपंताची हरामखोरी बाळाजी बाजीरावाला माहीत नसल्यामुळें, १६ जानेवारी १७६१ ला म्हणजे पानिपतची लढाई होऊन तीन दिवसांनीं व गोविंदपंत वारल्यापासून २५ दिवसांनीं बाळाजी बाजीरावानें गंगाधरपंताला समाधानाचें पत्र पाठविलें, त्यांत गोविंदपंताची तारीफ केली होती. (मराठ्यांचे पराक्रम, पृष्ठ १४७) ह्यावरून असें दिसतें कीं सदाशिवरावभाऊनें व नारो शंकरानें मोहीम होत असतांना गोविंदपंताला पाठविलेलीं पत्रे १६ जानेवारी १७६१ पर्यंत पेशव्यांच्या नजरेस पडलीं नाहींत पुढेंहि कधीं हीं पत्रें पेशव्यांच्या नजरेस पडलीं नाहींत. पानिपतची मोहीम चालू असतां सदाशिंवरावभाऊचीं, नारो शंकराचीं, बाळाजी बाजीरावाचीं व इतर लोकांचीं गोविंदपंताला आलेलीं सर्व पत्रें येरंड्यांच्याजवळ राहिलीं. हीं पत्रे येरंड्यांच्या हातांत येण्याचें कारण नक्की काय असावें तें कळत नाहीं. परंतु गोविंदपंताच्या विरुद्ध पुरावा म्हणून येरंड्यांनीं त्यांचा ताबा घेतला असावा असा तर्क करणें साहजिक आहे. पानिपतची मोहीम झाल्यावर, खरें म्हटलें असतां, गोविंदपंत बुंदेल्याचें कृष्ण कारस्थान बाहेर पडावयाचें. परंतु येरंड्यांची गोविंदपंताच्या चिरंजीवांनीं मूठ दाबिली म्हणा किंवा रघुनाथरावदादा व सखारामपंत बोकील ह्यांच्या अंतस्थ मसलतीनें म्हणा, गोविंदपंताचें हें बंड बाहेर पडलें नाहीं. नाहीं तर, मल्हाररावासारख्याचाहि समाचार घेण्यास ज्यानेंमागें पुढें पाहिलें नाहीं त्या माधवरावानें गोविंदपंताच्या वंशजांना शिक्षा दिल्यावांचून सोडिलें असतें असें संभवत नाहीं. गोविंदपंताच्या वर्तनाची चौकशी करण्यास बाळाजी बाजीरावास स्वास्थ्यहि नव्हतें व वेळहि नव्हता. पानिपत येथील भयंकर वृत्त ऐकून बाळाजीच्या मनानें पराकाष्टेची धास्ती घेतली व तेव्हांपासून कामकाज बघण्याला त्याचें मन घेईंना. ह्या अवधींत बहुतेक सर्व कारभार रघुनाथरावदादा व सखारामबापू ह्या दोघांनीं आवरला होता. ह्या दोघांनीं सदाशिवरावभाऊला विघ्नें आणण्याचें काम चालविलें होतें असा बळकट संशय घेण्यास कारणें आहेत (ऐतिहासिक लेखसंग्रह, २५, ७१) ह्या विघ्नें आणण्याच्या खटपटींत गोविंदपंत व त्यांचे चिरंजीव आणि येरंडे हे, एकेक किंवा सर्व मिळून एकाच वेळीं, किंवा एंका पाठीमागून एक, समयानुसार, निरनिराळ्या कार्यांकरितां निरनिराळ्या कारणांनीं प्रोत्साहित होऊन, सदाशिवरावाच्या विरुद्ध गेले असावे व पुढें केलेलीं कारस्थानें गोपन करणें सर्वांनाच इष्ट व सोयीचें वाटलें असावें असा संशय येतो. उत्तरेकडील सरदारांचीं मनें कलुषित करण्यास कारण कांही अंशीं सखारामबापू झाला असें म्हणण्यास आधार आहे.