[२३८] ।। श्री ।। २ सप्टेंबर १७६०.
पुरवणी राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि:
विनंति उपरि. आज छ २१ मोहरमी संध्याकाळी अबदालीकडील तुराणी वगैरे लोक पांच सहा हजार तयार होऊन गाजुदी नगरच्या रोखें गेले; ऐसी बातमी जासुदाचे जबानीवरून कळली. त्यावरून तुह्मांस लिहिलें असे. तरी तुह्मी आपले जागां सावध राहणें. न कळे कदाचित् तिकडे आले तरी येतील. यास्तव सावध खबरदारीनें राहून लांबवरी बातमी चांगली राखीत जाणें, वर्तमान लिहिणें. जाणिजे. छ २१ मोहरम. हे विनंति.