प्रस्तावना
विवेचन सातवें.
पानिपतच्या लढाईचे परिणाम काय झाले? तर (१) प्रथम मराठ्यांचें पाऊल आंत आलें. (२) नजीबखानाला आपला प्रांत व दिल्लीचें कांहीं वेळ पुढारपण मिळालें. (३) होळकराची पेशव्यांचीं धोत्रें बडविण्याची भीति नाहीशी झाली. (४) सुजाउद्दौल्याला अयोध्या, काशी, प्रयाग वगैरे प्रांतांत मराठ्यांचा उपद्रव पुन्हां झाला नाहीं. (५) रोहिलेहि मराठ्यांच्या कचाटींतून सुटले. (६) जानोजी भोसल्याचें कांहीं वेळ वजन वाढलें. (७) गायकवाड जिवंत राहिले. (८) जंजि-याच्या हबशाला दम आला. (९) दिल्लींच्या पातशहाचें दैन्य दुणावलें. (१०) स्वामिभक्त शिंद्यांना गेलेली सत्ता पुन्हां स्थापण्याची दुबार मेहनत पडली. (११) पुंड, पाळेगार य मवासी ह्यांना दंगे करण्यास अवधि मिळाली. (१२) सलाबतजंगाचा प्रधान निजामअली ह्याला गेलेला प्रांत मिळवण्याचा हुरूप आला. (१३) मराठ्यांच्या ताब्यांत श्रीरंगपट्टण जावयाचें राहून हैदरअल्लीला तेथें आपली सत्ता स्थापितां आली. (१४) रजपुत संस्थानिकांना कांहीएक न मिळतां उलट पुढें मराठ्यांकडून जाच मात्र जास्त झाला. (१५) सातारच्या छत्रपतींचे नांव समूळ नाहीसें व्हावयाचें तें झालें नाहीं. (१६) सातारची व कोल्हापूरची गादी जोडण्याचें काम तहकूब झालें. (१७) पश्चिमोत्तर प्रदेशांत शीख लोकांची सत्ता रूजून वाढीस लागली. (१८) बंगाल्यांत व मद्रासेंत इंग्रजांची सत्ता कायमची स्थापिली गेली. १७६१ च्यापुढे हिंदुस्थानची पातशाही मिळविण्याची चढाओढ इंग्रज व मराठे ह्यांच्यामध्यें लागली. तिची आस्ते आस्ते वाढ १७९६ पर्यंत होत होती. नानाफडणिसाच्या शहाणपणानें इतर संस्थानांप्रमाणें मराठ्यांना इंग्रजांनीं गिळलें नाहीं इतकेंच कायतें श्रेय नानाच्या मुत्सद्देगिरीला देतां येतें. परंतु, इंग्रजांची संस्कृति मराठ्यांच्या संस्कृतीहून श्रेष्ठ होती. ही गोष्ट लक्ष्यांत आणिली असतां एवढें देखील श्रेय मिळविणें म्हणजे मोठीच कर्तबगारी करणें होय असें नि:पक्षपातानें कबूल करणें भाग पडतें. व (१९). अबदालीला पानिपतच्या मोहिमेपासून कांहीएक फायदा झाला नाहीं. मराठ्यांची हानि झाली खरी; परंतु, अबदालीच्यांतहि फारसा राम राहिला नाहीं. जर त्याच्या अंगी कांहीं सामर्थ्य राहिलें असतें तर तो बाबराप्रमाणें हिंदुस्थानांत रहाता. परंतु पानिपतची लढाई झाल्याबरोबर त्यानें तडक विलायतेचा रस्ता धरिला. तो दिल्लीचा पातशाहाहि झाला नाही; त्याला पंजाबांतील प्रांतहि मिळाला नाहीं व त्याला म्हणण्यासारखी लूटहि मिळाली नाहीं. एवंच अबदालीनें हिंदुस्थानांत येऊन कांहींच साधिलें नाहीं!!! मग त्यानें हा खटाटोप कशाकरितां केला ? स्वार्थ त्यार्ने कोणता साधला ? परमार्थ त्याला कोणता लाधला ? “ ते के न जानीमहे ” म्हणून कोणी संस्कृत कवि आश्चर्यानें उद्वार काढतो ते खरे आहेत.