[२३७]                                      ।। श्री ।।            २ सप्टेंबर  १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसि:

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुमचीं पत्रें आलीं तीं पावलीं. ठाण्याचा बंदोबस्त होऊन गंगाकिनारा जाऊन शह देतों ह्मणोन व अबदालीकडील व रोहिले सुज्यातदौले यांजकडील वर्तमान विस्तारें लिहिलें तें कळले. ऐशियास, आह्मी प्रस्तुत दिल्लींत राजश्री नारो शंकर यांस तीन हजार प्यादे व तीन हजार राऊत व सामान सरंजामसुद्धां ठेऊन बंदोबस्त केला आहे. पलीकडून रोहिले अबदाली यांची तहाचीं राजकारणेंहि आलीं आहेत, बोलतात. सुज्यातदौले यांचेंहि फारकरून राजकारण आहे. ठहराव अद्यापि कोणताहि नाहीं. याकरितां आह्मीं सर्व घाटांचे बंदोबस्त केलेच आहेत. तूर्त त्यांजकडील राजकारणाचा बनाव बसतो न बसतो हें पहात येथे बसल्यानें ठीक नाहीं. याकरितां कुंजपु-याकडेहि जाणार आहों. येथील बंदोबस्त केलाच आहे. व आह्मी तिकडे गेल्यानंतर तेहि इकडे राहत नाहींत. त्या रोखें सहजांत येतील. तेव्हां दिल्लीकडील शह चुकला. आपला मुलूख पाठीस३०६ पडोन लढाई पडली तरी तिकडेच पडेल. असाहि प्रकार योजेला आहे. करूं. तुह्मीं यावयाचा मजकूर लिहिला तरी तूर्त इकडे न येणें. तुह्मी व राजश्री गोपाळराव गणेश ऐसे मिळोन दहा बारा हजार फौजेनिशीं कनोजेजवळ पलीकडील दबावास जाऊन रहावें. ह्मणजे सहजच पलीकडून रोहिले इकडील गेले आहेत ते व तिकडून येणार त्याजवरी दबाव पडेल. ते इकडे यावयाचें करणार नाहींत. सुज्यातदौले ममतेनें बोलतात, परंतु मोगली लोकांचा विश्वास नाहीं. यास्तव तुह्मी तेथें जवळोन असिल्यास याच्याहि मुलखांत शह पडेल. याची वर्तणुक ठीक न जाहलिया मुलखाची जफ्ती अगर जमीदारांकडून फिसाद करावयास येईल. सर्वां गोष्टीनें ठीक पडेल. बंगसाकडील व सादतखान अफरादी वगैरे याजकडील राजकारणें आलीं आहेत जे आह्मी येथून हरएक बहाणा करून तिकडे निघोन जाऊन गोविंद बल्लाळ यांजवळ जमा होऊं. ऐसें आहे. यास्तव जो त्यांचा सरदार तुह्मांस सरकारचें पत्र घेऊन येईल त्याजला आपत्याजवळ जमा करून ठेवणें. इकडे हुजूर येऊं म्हणतील तरी हुजूर पाठवणें. याप्रमाणें येतील त्यांचा बंदोबस्त करणें. तुम्हाकडे याविषयीं राजश्री गोपाळराव गणेश यांस लिहिलें आहे, तेहि फौजसुद्धां येतील. तुह्मीं त्यांनीं मिळोन गंगाकिनारा धरून पलीकडे दबावास राहावें. ह्मणजे पलीकडील येणारास पायबंद बसून येऊं पावणार नाहींत. नावांचाहि बंदोबस्त करणें. बारीक मोठें वर्तमान होईल तें वरिचेवरी दो दिवसा आड लिहून जोडी हुजूर पाठवीत जाणें. चहूंकडील बातमी राखून लिहिणें. ऐवजाकरितां तुह्मांस वारंवार लिहितों, परंतु अद्यापि ऐवज येत नाहीं. येथें तो खर्चाची ओढ फार झाली आहे. तुह्मी तपशिल मात्र लावून लिहितां हें कामाचें नाहीं. मसलतीच्या प्रसंगीं तुह्मीं या प्रसंगीं तपशील लावूं लागला तरी कसें ठीक पडेल? हें सर्व बारीक नजरेनें उमजोन ऐवजाची तरतूद सत्वर करून मातबर ऐवज पाठवून देणें. येविषयीं हयगय परिच्छिन्न कामाची नाहीं. तुमचा हिशेब पुण्यांत होऊन विल्हेस लागला आहे. या अलीकडील सर्व अजमास हुजूर पाठविणें ह्मणून पेशजीं लिहिलें असतां अजमास येत नाहीं हें अपूर्व आहे. या उपरि पुण्यास हिशेब होऊन ताळेबंद करून दिला आहे तो व त्याजपासून आजपावेतों अजमास ऐसें सत्वर पाठविणें. विलंब न लावणें. + सोरमचे घाटीं पुलाची अवाई करणें. बंगसाचे मुलखांत उपद्रव करणें. येथून बंगस आफरिदी बहाणा करून तुह्मांस सामील होतील. रोहिलेहि पारचे येणार नाहींत. कित्येक टोपीवालेहि सरकारांत येणार ते तिकडे येतील. पत्र घेऊन येईल तो खरा. यापाई तकरार नाहीं. सावधता बातमी राखीत जाणें. आह्मी आलियावर तुह्मी फार तरतूद करणार असें बोलत होतां. तें बहुधा विसरलासें वाटतें. मातबर मामला सहा महिने लिहितां भागलों. दोन लाख रुपये आले हें उत्तम कीं काय ? जरूर रसद वगैरे दहा पंधरा लाख सत्वर पोहोचावणें. हिशेब विल्हेस लागला त्याची नकल व ३०७सबांत बेहेडा पुढील केला व पुण्याहून जाजती जमा व खर्च लिहून अजमास लिहून पाठविले त्याच्या नकला व कमाविशीपासून तुमचा हिशोबाचा अजगास सत्वर पाठविणे. अजमास तयार नसला तर मागील बेहेडे व हुजूरचेच अजमास सत्वर पाठविणें. मागून तेहि पाठविणें. तिकडे काम मातबर. तुह्मीं इकडे न येणें. लिहिलेप्रमाणें तरतूद करणें. रवाना छ २१ मोहोरम. बहुत काय लिहिणें. गोपाळरावहि तुह्मांजवळ येतील. त्यांचे व शहाजादियाचें वर्तमान लिहीत जाणें. हे विनंति.