प्रस्तावना
मराठ्यांच्या वाढत्या साम्राज्यांत योग्य कल्पनांचें बीं पेरण्यास ह्या कलेचाच प्रवेश महाराष्ट्रांत झाला पाहिजे होता. घोरपडे, शिंदे, होळकर, भोसले, कोल्हापूरकर, सांवत, आंग्रे वगैरें सरदारांच्या पदरीं फिरंगी, फराशिस, इंग्रज वगैरे बरेच देशचे लोक पेशवाई जाईतोंपर्यंत व पुढें देखील होते असें असून ज्याअर्थी मराठ्यांनीं ही कला उचलली नाहीं त्याअर्थी त्यांच्या ग्राहकशक्तीच्या कीर्तीला बराच कमीपणा येतो हे निर्विवांद आहे (२) मुद्रणकलेसारखा उघड उघड डोळ्यावर येणारा गुण ज्या लोकांच्या ध्यानांत आला नाहीं त्यांचे भूगोलाचें व इतिहासाचें ज्ञान कोते असावें ह्यांत मोठें नवल नाहीं. (३) परंतु ज्या वस्तूंची मराठ्यांना दर घडीस अत्यंत जरूर लागत असावी असा आपण तर्क करितो त्यांपैकहि कांहीं वस्तू मिळविण्याची मराठ्यांनीं इच्छा दर्शविली नाहीं व प्रयत्न केला नाहीं. धुळपांना व आंग्रयांना लोहचुंबकाची व तारवें बांधण्याच्या गोद्यांची जरूर विशेष होती. या दोन्ही गोष्टी त्यांनीं इंग्रजांच्या गलबतांतून व मुंबईत पाहिल्या होत्या. परंतु, त्या स्वत: बनविण्याची उत्कंट इच्छा त्या प्रांतांतींल लोकांना किंवा पुणें येथील मुत्सद्यांना झाली नाहीं हें मोठ्या कष्टानें कबूल करावें लागतें ह्या इतक्या बाबींत मराठ्यांचें पाऊल मार्गे होतें. परंतु (४) एका बाबींत त्यांनीं आपली ग्राहकशक्ति चांगली दाखविली होती. ती बाब म्हटली म्हणजे कळेच्या तोफा व कवायती सैन्य ठेवण्याची तयारी ही होय. ह्या कामीं युरोपियन लोकांची श्रेष्ठता मराठ्यांनीं पाहिली होती. तेव्हां केशवराव पानशी, इभ्राईमखान आणि मुजफरखान गाड्दी ह्या इसमांकडून त्यांनीं ह्या बाबतींत प्रावीण्य संपादण्याचा प्रयत्न केला ही अभिनंदनीय गोष्ट आहे. उदगीरच्या लढाईत तोफा मारून मराठ्यांनी मोंगलाला खालीं पाडिलें व तोफा मारूनच अबदालीलाहि चीत करण्याचा त्यांचा विचार होता. हा विचार बहुश: सफल झाला असता, परंतु गोविंदपंत बुंदेल्यानें व मल्हारराव होळकरानें हरामखोरी केल्यामुळें ह्या सफलतेस दिरंग लागला. आतां हे गाडदी मराठ्यांना कितपत मानवले तें पाहण्यासारखें आहे. १७५० त सलाबतानें व १७५१ त मराठ्यांनीं गाडदी ठेवण्यास प्रारंभ केला. १७५३ त गाडद्यांचा मुख्य जो बुसी त्यानें सलाबताला निर्माल्यवत् केलें. १७५९ त श्रीरंगपट्टणांतील गाडद्यांचा मुख्य जो हैदर त्यानें श्रीरंगपट्टणची गादी बळकावली. १७६१ त बाळाजीच्या मृत्यूच्या दिवशीं पुण्यांत गाडदी दंगा करणार होते (लेखांक २८६). १७७३ त गाडद्यांनीं नारायणरावास ठार मारिलें. येणेंप्रमाणें यूरोपियन कवाईत शिकलेले गार्दी लोक हिंदुस्थानांतील देशी राजांना चांगलेसे मानवले नाहींत हें उघड आहे. विदेशी लोकांची पथकें प्रसंगानुसार धन्याच्या उरावरहि बसण्यास मागें पुढें पहात नाहींत ह्याचा अनुभव प्रिटोरियन गाडद्यांनीं रोमच्या पातशाहांस व जानिझारींनीं तुर्कस्थानच्या पातशाहांस जसा आणून दिला तसा मराठ्यांसहि लवकरच आणून दिला. इंग्रजांच्या हातीं महाराष्ट्र गेलें नसतें तर ह्या गार्घ्यांच्या हातांत तें पुढें मागें गेल्याशिवाय राहिलें नसतें असा माझा तर्क आहे. ह्या गाडद्यांचे स्तोम महाराष्ट्रांत पुढें पुढें तर फारच वाढलें. बहुतेक सर्व लहानमोठ्या सरदारांच्या पदरी गडदी असत. खुद्द नानाफडणिसाच्या मेणवलीस गाडद्यांचा पाहरा असे. देशी शिपाई टाकून विदेशी शिपाई जवळ ठेवण्यांत मोठीशी मुत्सद्देगिंरी होती असें नाही !