[२३६] ।। श्री ।। २९ आगष्ट १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसी:
पोष्य गोविंद बल्लाळ सा। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ मित्ति श्रावण वद्य ३ मु॥ तिरव जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असीलें पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान या प्रकारचें आहे. आह्मीं मौजे मही घेऊन सेगर नदीवर येऊन दरमजलींनीं तालगांवी ईसन नदीवर आलों. पाऊस अतीशय. चिखल झाला. नद्या भरल्या व जलमय सर्व जालें. परंतु तसेच भिजतच दरमजलींनीं तालगांवी ईसननदीवर आलों. पठाणाजवळ स्वार, प्यादे दोन हजार होते. परंतु त्याजला कळलें की कजियास आले. चार कोस त्याजसी आह्मांस अंतर राहिलें. त्याजवर त्यांणी मातबर वकील पाठवून सलूख केला. इतक्यांत नवाब अहमदखान याचीं पत्रें आह्मांस आलीं. साहेबजादे यांस व फकरदौला यांस आलीं. आह्मांस लिहिलें कीं सर्वस्वी मी तुमचा आहें. मागें मुलेमाणसें आहेत. चिरंजीव आहेत. तुमचे भरंवसेयावर वरकड कनवज वगैरे ठाणीं एक मतलबाकरितां बसविली होती. तुमची मर्जी. परभारें उठोन येतील. पुत्रास व हमसी फकरूदौला यास त्याणीं लिहिलें कीं पत्रदर्शनीं उठोन येणें. पंत सांगतील त्याप्रमाणें त्यांची मर्जी तुह्मीं राखणें. आणि बिबिनेंहि यास लिहिलें. ते उठोन फरूकाबादेस गेले. राजेश्री माधवराव यास नेऊन कनवजेंत बसविलें. दुसरे दिवशीं तिरवेयावर आलों. गढी तयार तिरवेयाची होती. पांचशें सातशें बरखंदाज जमा केला. चौफेर घेरून उभे राहिलों. हल्ला करावा हा विचार करीत होतों. तों फौज सभोंवती उभी राहिली. पाहोन घाबरे झाले. वकील येऊन रदबदली केली. कौल घेऊन समरासिंग बघेला भेटीस आला. गडी खालीं करून दिली. दुसरे रोजी आहेरवाला पेमशिंगहि भेटीस आला. गडी खालीं करून दिली. ठाणें सरकारचें बसलें. हटिया आज खालीं होईल. खणून टाकून खेरनगर, भुजाजंग, खतलाख, मोहना, बरगांव वगैरे तमाम खालीं झालीं. ठाणीं बसलीं. पाडितात. उदईक येऊन कुच करून, बिठुरास जाऊन, स्नान करून, घाटंपुरावरून उमरगडीं येऊन. श्रीमंत स्वामींच् कृपेनेंच हें कार्य झालें. नाहीं तर, मोठे संकट होतें. दोन मास गडी घ्यावयास लागती. सर्व उत्तम जालें. नक्षहि जाला. आणि कार्यहि जालें. माणूसहि जाया न जालें. संतोषाचें वर्तमान तुह्यांस कळावें ह्मणोन लिहिलें आहे. सुजातदौले जाऊन अनुपशहरीं भेटले. बहुत शिष्टाचार मुबरात शिरपाव अबदालीनें दिल्हा. दुसरे रोजीं वजिरीचा शिरपाव देऊं लागला. तेव्हां याणें विनंति केलीः “पातशाहा कोण ? मीं वजीरी कोणाची करावी ? तुह्मी पातशाही तखतीं बसा; मी वजीरी करीन. उगीच वस्त्रें देऊन माझी फजिती कां करितां ?” त्याजवर अबदालीनें सांगितलें कीं प्रातःकाळीं याचा जाब देऊन. त्याजवर रातीस सर्व लहान थोर अबदाली जमा करून मसलत केली कीं आपणास येथें राहणें नाहीं. आणि मराठे यांचा जोर दिवसेंदिवस होऊं लागला. त्यास कोणाची गोष्ट ऐकों नये. मराठे यांशीं सलूख करून आपले देशास जावें. हें वर्तमान बोलत आहेत. बहुत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.