प्रस्तावना
भूगोल व इतिहास ह्यांची माहिती बाळाजी बाजीरावाला व सदाशिव चिमणाजीला आपल्या कामापुरती यथास्थित होती ह्यांत संशय नाहीं. परंतु युरोपांत तत्कालीन दरबारांतून म्हणजे पंधरावा लुईं, बडा फ्रेडरिक, दुसरा जॉर्ज ह्यांच्या दरबारांतून व राज्यांतून भूगोलाचें व इतिहासाचें जें ज्ञान त्यावेळीं होतें त्याच्या मानानें पेशव्यांच्या दरबारचें इतिहासाचें व भूगोलाचें ज्ञान अगदींच क्षुद्र होतें हें कबूल करणें योग्य आहे. कपिल, कणाद वगैरे पुराण मुनींनीं प्रणीत शास्त्रांच्या व्यतिरिक्त युरोपांत ठाऊक असलेल्या शास्रांचा गंधहि पेशव्यांच्या राज्यांत कोणाला नव्हता. पाठशाला, विद्यापीठें, विद्वत्सभा, अजबखानें, वादसभा, शोधसभा, पृथ्वीपर्यटणें, वगैरे युरोपियन संस्था पेशव्यांच्या राज्यांत नव्हत्या इतकेंच नव्हे; तर त्या दुसरीकडे कोठें आहेत किंवा काय ह्यांचाहि पत्ता महाराष्ट्रांत कोणाला नव्हता. ह्या नकारात्मक वाक्यांचा इत्यर्थ एवढाच कीं १८ व्या शतकाच्या पूर्वार्धांत व उत्तरार्धांत मराठ्यांची संस्कृति युरोपांतील प्रगत राष्ट्रांच्या संस्कृतीहून कमी दर्जाची होती. ती कोणकोणत्या गोष्टींत तशी होतीं त्याचा अंशत: निर्देश वर झालाच आहे. एक दोन विशेष मुद्यांचा विचार पुढें करितों.
अठराव्या शतकांतील पश्चिम युरोपांतील संस्कृतीची व महाराष्ट्रांतील संस्कृतीची तुलना करूं पाहतां शेंकडों भेद दृष्टीस पडतात. पैकीं कांहींचाच उल्लेख करणे येथें इष्ट आहे.
(१) मराठ्यांच्या संस्कृतींत प्रथम व्यंग म्हटलें म्हणजे त्यांना छापण्याची कला माहीत नव्हती व ती माहीत करून घेण्याचा त्यांनीं कधीं प्रयत्नहि केला नाहीं. १४९८ च्या ११ मेला गामानें हिंदुस्थान शोधून काढिलें. तेव्हांपासून १७६० पर्यंत फिरंग्यांच्या व मराठ्यांच्या मुलाखती अनेक ठिकाणीं झाल्या. गोमांतक, सावंतवाडी, वसई, कोची, दाभूळ, दिव, दमण वगैरे स्थलीं मराठ्यांच्या फिरंग्यांशीं गांठी पडलेल्या आहेत. वलंदेज (डच्) व डिंगमार (डेन) ह्या लोकांनाहि मराठे ओळखत असत. मुसाबूसी वगैरे फेंच लोकांशीं तर मराठ्यांची चांगलीच घसट असे. मुंबई, सुरत, बाणकोट, विजयदुर्ग, राजापुरी, दाभोळ वगैरे ठिकाणीं इंग्रजांचीहि जानपछान मराठ्यांना झाली होती. मुंबईतील परभू, शेणवई, पारशी, भाटे व वाळुकेश्वरचे छत्रे, भातखंडे वगैरे ब्राह्मण पुजारी व बैरागी इंग्लिश लोकांशीं हरहमेश दळणवळण ठेवीत. कित्येकांना चांगलें इंग्रजी लिहितां व बोलतां येत असे. त्यांनीं छापील पुस्तकें पाहिलीं होतीं ह्यांत संशय नाहीं. नानाफडणिसाच्या दफ्तरांत छापील इंग्रजी नकाशे अद्यापहि आहेत. मोरोबादादाच्या घरच्या पुस्तकालयांत एक इंग्रजी चोपडी होती असें त्याच्या पुस्तकाच्या यादीवरून कळतें. असें असून म्हणजे यूरोपांतील सर्व देशचे लोक त्यांच्या दारीं उभे असून मराठ्यांनीं छापण्याची कला कशी घेतली नाहीं ह्याचें मोठें आश्चर्य वाटतें.