प्रस्तावना
पुरुषांप्रमाणे अत्यंत कुलीन स्त्रियानांहि लिहितां वाचतां येत असे. व्यवहारशिक्षण बहुतेक सर्व ब्राह्मणांना, वैश्यांना व उचप्रतीच्या मराठ्यांना मिळत असे गृहस्थ, ब्राह्मण व मराठे ह्यांचे धंद्याच्या मानानें तीन वर्ग करितां येतील: - (१) स्वतःची शेतवाडी पहाणारे, (२) कारकुनी धंदा करणारें, (३) व शिपायगिरीचा पेषा स्वीकारणारे. ह्या तिन्हीं धंद्यांतील लोकांना वर सांगितलेल्या व्यवहारशिक्षणाच्या पलीकडे माहिती म्हटली म्हणजे वयपरत्वें येणा-या जगाच्या अनुभवाखेरीज जास्त कांहीं एक नसे. कारकुनांना व शिपायांना हिंदुस्थानचें भूज्ञान स्वत: हिंडून जें कांहीं मिळे त्यापलीकडे बिलकूल नसे. हिंदुस्थानाव्यतिरिक्त इतर देशांचे भूज्ञान ह्या लोकांना कांहींच नसे. निपाणीजवळ भोज येथील कुळकर्ण्याच्या येथें मला एक अठराव्या शतकांतील पृथ्वीचा नकाशा सांपडला. त्यांत सप्तसमुद्रात्मक पृथ्वी शेषाच्या मस्तकावर दिली असून, चीन, इंग्लंड, रावणाची लंका वगैरे दशांच्या दिशा स्थूल मानानें बरोबर दाखविल्या आहेत व हिंदुस्थान चतुष्कोणाकृति काढिला असून तासगांव हिंदुस्थानचा मध्य धरिला आहे. परंतु हें भूगोलज्ञान सामान्य जनांचे झालें. स्वत: पेशवे व त्यांचे सरदार ह्यांचे भूगोलज्ञान ह्या लोकांच्यापेक्षां अर्थात् जास्त विस्तृत व व्यवस्थित असे. फिरंगी, फंराशिस, बलंदेज, डिंगमार, आफ्लंदोर, दुराणी, तुराणी, अरब, गिलच्ये, हवशी, शामळ, तुर्क, यवन, इराणी, शिद्दी, इंग्रज, मोरस, आफरीदी, वगैरे अठरा टोपीवाल्यांचे देश, व हिंदुस्थानांतील राजांचे छप्पन्न देश पेशव्यांना व त्यांच्या मुत्सद्यांना कित्येक नांवानें व कित्येक स्वदृष्टीनें माहीत होते. देशोदेशीचे वकील पेशव्यांच्या दरबारी मोठ्या इतमानाने राहत असत (का. पत्रे, यादी वगैरे १३४) त्यांजपासूनहि, त्यांच्या देशांची माहिती पेशव्यांना मिळत असण्याचा अवश्य संभव आहे. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतांचे नकाशे पेशव्यांजवळ असत. लढाया झाल्या म्हणजे तह ज्या अर्थी होंत त्याअर्थी पेशव्यांजवळ नकाशे असत हें मुद्दाम सांगण्यांत विशेष मुद्दा आहे, असें नाहीं. महाराष्ट्रांत बखरी वाचण्याचा व लिहिण्याचा प्रघात फार असे. तेव्हां मराठ्यांच्या व यवनांच्या इतिहासाचें ज्ञान महाराष्ट्रांत बहुश: सार्वत्रिक होते असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. पाणिपतच्या बखरीचा कर्ता रघुनाथ यादव यानें त्या बखरीच्या १९ व्या पृष्ठावर मराठ्यांच्या सर्वव्यापी सत्तेचा प्रसार कसकसा होत गेला व सर्व हिंदुस्थान हिंदुमय करून टाकण्याचा मराठ्यांचा मनोदय होता वगैरे गोष्टी अबदालीच्या तोंडून वदविल्या आहेत. त्यावरून इतिहास व भूगोल ह्मांचे ज्ञान रघुनाथ यादवाला थोडें थोडकें नव्हतें असें दिसून येतें. रूमशाम म्हणजे कुस्तुंतुनिया येथें इ.स. १७३० पासून १७५४ पर्यंत राज्य करणा-या सुलतान महमदाचेंहि नांव रघुनाथ यादवाला माहीत होतें. (र. या. पा. व. पृ. १९, टीप) असें त्यावरून ठरतें.