प्रस्तावना
सारांश, सरदारांच्या उच्छंखलवृत्तीला आळा घालतां येण्याजोगीं साधनें त्याकालीं पेशव्यांच्या जवळ नव्हतीं असेंच कबूल करणें ओघास येतें. सरदारांच्याप्रमाणें जिंकलेल्या प्रांतांतील लोकांची मनें आकर्षून घेण्याचींहि साधनें पेशव्यांच्या जवळ नव्हतीं. कथा, पुराणें, यात्रा वगैरे संस्था सतराव्या शतकांतल्याप्रमाणें अठराव्या शतकांतहि चालूं होत्या. परंतु, सतराव्या शतकांतला जिंवतपणा अठराव्या शतकांतील कथापुराणांत राहिला नव्हता. येणेंप्रमाणें मराठ्यांच्या राजकारणाला सरदारांचीं व प्रजेचीं मनें उपयोगीं पडण्यास योग्य जेणेंकरून होतील अशी---ग्रंथ, व्याख्यानें वगैरे---साधनसंपत्ति पेशव्यांनीं तयार न केल्यामुळें हिंदुस्थानांतील मराठे सरदार व तद्देशीय संस्थानिक व सामान्यजन पानिपतच्या मोहिमेच्या अगोदर व नंतर मराठ्यांच्याविरुद्ध उठले ह्यांत तिळमात्र संशय नाहीं. ग्रंथसमूहाचा, धर्मव्याख्यानांचा, साधुसंताचा व यात्राजत्रांचा उपयोग राष्ट्रांतील लोकांच्या मनाला नीट वळण देण्यास केवढा मोठा होतो ही गोष्ट शहाजी व शिवाजी ह्यांच्या मनांत जशी बिंबली होती तशी बाळाजी बाजीरावाच्या व सदाशिव चिमणाजीच्या मनांत भरलेली दिसत नाहीं. शिवाजी व बाळाजी ह्यांच्यामधील महदंतर हेंच होय. राज्यें मिळविण्यास जसा तोफांचा व शिपायांचा उपयोग होतो तसा तीं कायम राखण्यास व जतन करण्यास व्याख्यानांचा व विचारी पुरुषांचाहि होतो.
हें तत्व पेशव्यांच्या ध्यानांत कां आलें नाहीं ह्याचें कारण शोधण्यास फारसें लांब जावयास नको. त्या वेळीं महाराष्ट्रांत विद्येची व शिक्षणाची स्थिति कशी होती ह्याचा विचार केला असतां ह्या कारणाची अटकळ बांधितां येण्यासारखी आहे त्या वेळच्या विद्येचे स्थूल मानानें तीन भाग करितां येतील: - (१) वैदिक, (२) शास्त्रीय व (३) व्यावहारिक वैदिक ब्राह्मण दश ग्रंथाचें पठण करीत; षट्शास्त्रांचा जिम्मा शास्त्रीपंडितांनीं घेतला होता; व ब्राह्मणवैश्यादि इतरजन व्यवहाराला उपयोगीं जें ज्ञान ते ज्ञान संपादन करीत. वैदिक व शास्त्रीपंडित ह्यांना राजाश्रय असे व व्यावहारिक शिक्षणाच्या शाळेंतील पंतोजींना लोकाश्रय असे. व्यवहारशिक्षणांत अक्षरांचे कित्ते, संसारचोपडी, वरावर्दीगणित, मराठ्यांच्या व मुसुलमानांच्या बखरी व तवारिखा, विक्रमबत्तीशी, वेताळपंचविशी, शुकबहात्तरी, लटकचाळिशी, भारत, भागवत व रामायण ह्या “ इतिहासग्रंथांतील “ आख्यानांच्या मराठी बखरी, रामरक्षादि स्तोत्रें, जमाखर्चाच्या पध्दति भूमापन, पत्रें लिहिण्याचे मायने, मराठी कविता, वगैरेचा समावेश होत असे.