[२३३] ।। श्री ।। २१ आगष्ट १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. अबदालीची फौज दिल्ली घेतली यामुळें फार घाबरी जाहली. रोहिले फारकरून पार गेले. राहिले जाणार. नजीबखान मात्र हिंमत धरून दाखवितो. सुज्याअतदौला जाऊन फसले आहेत. याजकरितां स्वामींनी दम धरून काम करावें. पुरतेंच त्याचें पारपत्य होईल. फौजसुद्धां यावें तर इकडे ठाणी कायम करणें हें काम टाकून येतां नये. याजकरितां गुंतलों ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐशियास, दिल्ली घेतली. त्याजवर सलाबत चढली. आंत फार फुटफाट आहे. परंतु नजीबखान त्यास हिमती देऊन आपलें बरें करून घेऊन त्यास लावणार. त्यास येथेंहि नजीबखान व सुज्याअतदौला वगैरे राजकारणें आहेत. परंतु अद्यापि ठीक बरें कोणीहि बोलत नाहींत. पुढें होईल तें पाहूं. त्यास येथें कित्येक तुराणी फूटून चाकरीस येणार त्यासि करार हाच कीं उठोन अंतरवेदींत जावें. तुह्माजवळ जमा व्हावें आणि पार उतरणें जाहलें तर उतरावें. अथवा तेथून आगरियाकडे उतरून आणणें तर आणावें. असे प्रकार बोलतात. येणार त्यास पत्रें तुह्मांकडे जावयाचीं देऊन रवाना करूं. ते येतील त्यांस आपलेजवळ जमा करणें. दुसरें रोहिल्यांचें अनुसंधान आहे कीं आपले तालुकियांत पार उतरावयाची अवाई घालावी आणि गंगातीरीं कनोजपुढें आमचे मुलखांत फौज आली ह्मणजे पार गेले ते येणार नाहींत. व येथें जे दुदिले आहेत तिकडील दंगियामुळे उठोनि येतील. त्यांची गुज मोडेल. हा प्रकार आहे. तरी तुह्मीं कनोजेपुढें रोहिल्यांच्या मुलखात गंगातीरी येऊन पार उतरावयाची अवाई घालणे. गंगातीरी राहणें ह्मणजे यास पायबंद बसेल. आणि जे दुदिले जाहले असेत ते यास सोडून जातील. हें काम करणें. फौज बुंदेले वगैरे जमा करणें. पैका लौकर रवाना करणें. सादुल्लाखान वगैरे रोहिले हे ह्मणतात कीं फुला नावाडी यास गंगातीरी फौजा पावया बोलवावें. आपणहि त्यास पाठवून देतों. आणि नावा जमा करून पार उतरावयाचा हंगाम करावा. ह्मणजे हें निमित्य ठेवून सारे तिकडे निघोन जाऊं. त्यास त्याजलाहि पत्र दिलें आहे. तरी तुह्मीं फुला नावाडी यास बोलावून नेऊन लिहिल्याप्रमाणें करणें. जाणिजे. छ ९ मोहरम. बहुत काय लिहिणें. हे विनंति.