[२४५] ।। श्री ।। १९ सप्टेंबर १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. अबदालीचे पारपत्यास चिरंजीव राजश्री भाऊ व विश्वासराव गेले आहेत. राजे हिंदुपत याणीं आपले फौजसुद्धां जाऊन सामील व्हावें. येविशीं चिरंजिवाचीं पत्रें त्यांस येत असतां अद्याप जात नाहीं हें त्यांस उचित् नाहीं. तरी तुह्मीं हिंदुपतीस बहुत प्रकारें समजाऊन सांगून फौजसुद्धां सत्वर निघोन जात ते गोष्ट करणें. श्रीकृपेनें पठाणाचें पारपत्य चिरंजीव करीतच आहेत; परंतु, हिंदुपत जाऊन न पावल्यास त्यांचे कल्याणावह नाहीं. असें त्यास सांगून त्यांचें जाणें सत्वर होय तें करणे. जाणिजे. छ ९ सफर सु॥ इहिदे सितैन मया व अलफ + बहुत काय लिहिणें हे विनंति.