प्रस्तावना

सर्व बखरींचा एकीकृत आधार घेतला असतां तो विश्वासार्ह होतो असेंहि ह्या ग्रंथकारानें प्रतिपादिलें आहे. परंतु, हीं सर्व विधानें भ्रामक आहेत हें मीं ह्या प्रस्तावनेंत १७५० पासून १७६१ सालापर्यंतच्या इतिहासासंबंधाने तरी साधार दाखवून दिले आहे. माझ्या मतें, ग्रांट् डफ् चा ग्रंथ बहुत प्रकारें अपूर्ण आहे इतकेंच नव्हें, तर कित्येक ठिकाणी तो अविश्वसनीयहि आहे. त्यानें मराठ्यांच्या इतिहासांतील बहुतेक प्रसंगांचे वर्णन दिलें आहे अशी बिलकुल गोष्ट नाहीं. आपल्या ग्रंथाचे पहिले सोळा भाग बखरवजा समजावे म्हणून तो स्वतः लिहितो. १७५० पासून १७६१ पर्यंतचा ग्रांट डफ् च्या ग्रंथाचा भाग बखरींपेक्षां थोडासा बरा आहे, परंतु ह्यापेक्षां जास्त शिफारस त्या ग्रंथाची करितां येत नाहीं म्हणून मागें मीं सिद्ध करून दाखविलें आहे. असें असून त्याचा ग्रंथ बहुतेक पूर्ण आहे म्हणून जे कित्येक लोक म्हणतात तो केवळ गैर समजुतीचा प्रकार आहे. तसेंच ग्रांट् डफ् चा ग्रंथ आधाराला घेऊन ज्यांनीं ज्यांनीं म्हणून चरित्रें किंवा इतिहास लिहिले आहेत त्यांचीहि किंमत ग्रांटडफ्च्या बरोबरच करणें रास्त आहे. आजपर्यंत जितकीं म्हणून चरित्रें किंवा इतिहास मराठींत लिहिले गेले आहेत तितक्यांची व्यवस्था ही अशी आहे. अशी जर व्यवस्था आहे तर मग मराठ्यांचा इतिहास लिहावा तरी कसा असा प्रश्न साहजिक उद्भवतो. ह्याला उत्तर असें आहे कीं मराठ्यांचा इतिहास शास्त्रीय पद्धतीनें लिहिला तरच त्याला कांहीं किंमत देतां येईल. इतिहास लिहिण्याला प्रस्तुतची संधि महाराष्ट्रांतील लोकांना मोठी उत्तम आली आहे. इतिहास उत्तम त-हेनें कसा लिहितां येईल ह्याची फोड युरोपांतील शास्त्रयांनीं करून ठेविलेली आहे. ह्या फोंडीचा फायदा करून घेऊन मराठ्यांच्या इतिहासाची इमारत उभारली पाहिजे. युरोपांत सतराव्या व अठराव्या शतकांत इतिहासकारांनीं व चरित्रकारांनीं ज्या चुक्या केल्या त्याच जर आपण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीं करूं लागलों तर एकोणिसाव्या शतकांतील युरोपाशीं आपला परिचय व्यर्थ झाला असें होईल मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणा-यांनीं खालील कलमें लक्ष्यांत बाळगिलीं पाहिजेत. (१) कोणताहि पूर्वग्रह घेऊन इतिहास किंवा चरित्रें लिहावयास लागूं नये. आतापर्यंत लिहिलेल्या बहुतेक चरित्रांतून हा दोष ढळढळीत दिसून येतो. महादजी शिंदे, गोविंदपंत बुंदेले, परशरामभाऊ पटवर्धन, बापू गोखले, पहिला बाजीराव, वगैरे सर्व सेनानायक एकासारखे एक अप्रतिम योध्दे होते असा त्या त्या ग्रंथकारांचा सांगण्याचा झोंक असतो. आतां पहिल्या बाजीरावाच्या बरोबरीला ह्यांपैकीं एकहि योद्धा बसवितां येणार नाहीं हें उघड आहे. तसेंच बाजीरावाच्या खालोखाल महादजीच्या तोडीचा ह्यांत एकहि सेनापति नाहीं. परशरामभाऊ पटवर्धन दुय्यम प्रतीचा सेनानायक होता असें मला वाटतें. गोविंदपंत बुंदेले व बापू गोखले हे कनिष्ठ प्रतीचे सेनापति होत, हें कोणीहि समंजस मनुष्य कबूल करील. बापू गोखल्यानें तर कोण्याएका गो-याचें सर्टिफिकेट घेऊन ठेविलें होतें ! सर्टिफिकेट्या सेनापतीची किती किंमत करावयाची तें मुद्दाम फोड करून सांगितली पाहिजे असें नाहीं ! हें सेनापतित्वासंबंधीं झालें. कित्येकांचा पूर्वग्रह मराठे सर्व प्रकारें श्रेष्ठ होते असें दाखविण्याचा असतो; कित्येकांचा ह्याच्या उलट असतो. तेव्हां पूर्वग्रहांना टाळा देणें ही मुख्य गोष्ट होय.