[३४७]                                                                         श्री.                                                                २५ जानेवारी १७४३.

श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामी वडिलाचे सेवेसी :-
अपत्यें तुळाजी आंगरे चरणावर मस्तक ठेवून साष्टांग दंडवत प्रणाम विनंति माघ शुध्द एकादशी भौमवासरपर्यंत स्वामीचें कृपेकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. स्वामीचें आज्ञापत्र सादर जाहालें. प्रविष्टकालीं आनंदाच्या काठी प्राप्त होऊन सनाथ जाहालों. पत्री कितेक अपत्यांस बुध्दिवादाचें शिक्षापन व पूर्वी वडिलांचे निष्ठेचा अर्थ लेखनें आज्ञापून, पुढें अविनाभावें चरणाजवळ वर्तावें ह्मणजे तेणेंकरून सर्व कल्याणें प्राप्त होऊन विजयता पावाल व माझा हस्त मस्तकी ठेविला जाईल. ज्यांणी माझा अनादर केला त्याची गत काय जाहाली हें समजणें व पुढेंही वर्तणूक निष्ठायुक्त करीत जाणें. येविशी बहुतप्रकारें अपत्यास बुध्दिवाद लिहिला. ऐशास, हें दार पूर्वी वडिलांपासून स्वामीच्या आशीर्वादाचें आहे. त्यास, एकादे समयीं अंतर जाहालें व स्वामीनीं कोप केला, तथापि, आपले वरदी आहेत त्याचें कल्याणच होईल. येथें संदेह मानावा ऐसा नाहीं. निमित्य कीं स्वामीची सेवा वडिलांही करून कृपा संपादून घेऊन वंशपरंपरागत स्वामीचें चरणाशी जोड संपादिली आहे. याचा सविस्तर अर्थ पूर्वोत्तर सेवेस विदित असेल. वरकड सेवकाचे निष्ठेचा व आचरणाचा अर्थ तरी सेवकास स्वामीचे चरणाविरहित अन्यथा हित जाणत नाहीं, व सेवकाचे मनोरथ पूर्ण होतील हाच निश्चय मानिला आहे. राजश्री मानाजी आंगरे व तूंही एका विचारें असिल्याचें उत्तम आहे. येणेंकरून इतरांचा हात चालणार नाहीं, ह्मणोन लिहिलें. तरी सेवकाचे चित्ती हाच अर्थ अंत:करणापासून आहे. एका विचारें चालल्यास वडिलांचा मामला जागोजगानामोश सर्वही सिध्द आहेत. गेले जागे तेही स्वामीचे आशीर्वादें स्ववश्य होईल. यांसी अगाध आहे ऐसें नाहीं. सारांश याप्रमाणें त्याचे वर्तणुकीचा विचार प्रत्ययास आल्यावर आह्मांपासून अंतर किमपि नाहीं. मुख्य पदार्थ स्वामीचा आशीर्वाद सेवकाचे मस्तकी असतां इतराचा विषय मानीत नाहीं. सर्वांविषयीं वडील मायबाप स्वामी आहेत व सेवकापासून स्वामीचे चरणाजवळ आचरणांत तीळमात्र अंतर होणार नाहीं. कृपा वर्धमान करावी. हे विज्ञापना. हे विज्ञप्ति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries