लेखांक २३.
श्री.
१६२५ मार्गशीर्ष वद्य ७
'' स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३० सुभानु संवत्सरे मागशीर्ष बहुल सप्तमी रविवासर क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति याणी संताजीराव सिलंबकर व महीपतराव सिलंबकर देशमुख ता। गुंतणमावळ यासि आज्ञा केली ऐसी जे, अवरंगजेब किले राजगडास बिलगला आहे. मोर्चे चालऊन यालगार * * * करितो. परंतु तुह्मी त्यांचा हिसाब न धरितां शर्तीनसी नतीजा पाववितां ह्मणून * * * * * * * शंकराजी पंडित सचिव याणी लिहिलें व सांप्रत तुमचे मर्दानगीचे वर्तमान राजश्री सोनजी फर्जंद याणीं लिहिले त्यावरून कळो आले. तुमचे सेवेचा मजुरा जाला. तरी तुह्मी स्वामीचे एकनिष्ठ सेवक तरवारेचे आहा. पुढेहि एकच रीतीने अवरंगजेबास नतीजा पावऊन फत्तेचे वर्तमान लिहून पाठवणे. स्वामी तुमची सर्फराजी करितील. स्वामिकार्याविसी मशारनिलेचे आज्ञेप्रमाणे * * * * * * तेणेप्रमाणे करीत जाणे. निदेश समक्ष.''
लेखांक २४.
श्री.
१६२५ मार्गशीर्ष वद्य १०
' .॥ε म॥ अनाम प्रतापराऊ सिलंबकर देशमुख ता। गुंजणमावळ यांस शंकराजी नारायण सचिव आशिर्वाद सुहुरसन अर्बा मया अलफ. म॥ संताजीराऊ सिलंबकर तुमचे बाप राजगडीं सुवेळेस खासा मोर्च्यास होते. त्यास, औरंगजेबाच्या पादशाही मोर्च्याकडून त्यास गोळी लागोन स्वामिकार्यावरी पडिले. हे वर्तमान आजीच राजगडीहून आले. अशाच संताजीराऊ थोर कामाचे मर्दाने एकनिष्ट होते. त्यानी आपला पुरुशार्थच संपादून घेतला. याकरिता तुमचे सर्व प्रकारें चालवणे अगत्य आहे. तरी आपले माईचे बहुता रीतीं समाधान करून सांगणे. प्रस्तुत खर्चास बराबरी नरसप्रभु रुपये ४० च्याळीस व तुह्मास मंदिल व तुमचे मातेस पातळ जरी व चोळी पाठविले आहे हे घेणे. पुढेहि वरचेवरी कबिल्याचा परामर्श तो केला जाईल. तुह्मास इनाम गांव देण्याचा तह केला आहे, तरी बारा दिवस जालियाउपरी मकाजी सिलंबकर यास पाठऊन देणे. त्या बराबरी कोणता गाव इनाम द्यावा तो सांगोन पाठवणे. त्याप्रमाणे सनद करून दिल्ही जाईल. तुह्मी आपला दिलासा सर्व प्रकारे असो देणे. छ १३(२३) साबान सुरु सूद.''