प्रस्तावना

(२) भरपूर अस्सल माहिती मिळाल्याशिवाय चरित्र किंवा इतिहासाचा भाग लिहिण्याचा खटाटोप करूं नये. (३) तशांतूनहि लिहावयाचा संकल्पच असेल तर आपल्याला माहिती कोणती नाहीं तें स्पष्ट लिहावें. अस्सल भरपूर लेखसंग्रह जवळ असल्यावांचून जो कोणी इतिहास लिहावयाला जाईल त्याला माहिती नाहीं असा शेरा पुष्कळच प्रसंगांसंबंधीं द्यावा लागेल. (४) अस्सल भरपूर माहितीवरून कांहीं सिद्धांत काढावयाचा तो काढावा. हें चवथें कलम पहिल्या कलमाचेंच एका प्रकारचें रूपांतर आहे अशी समजूत होण्याचा संभव आहे; परंतु, तसा प्रकार नाहीं. पहिल्या कलमांत पूर्वग्रहप्रधान पद्धतीचा निर्देश केला आहे. व ह्या चवथ्या कलमांत पश्चाद्ग्रहप्रधानपद्धतीचा निर्देश केला आहे. पूर्वग्रह मनसोक्त काढिलेलाच असतो. पश्चाद्ग्रह अस्सल भरपूर आधारांतून जात्या जो निघेल तोच घ्यावयाचा असतो. अलीकडे जे इतिहास व चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत त्यांत ह्या पूर्वग्रहाच्या पद्धतीचें प्राधान्य विशेष दिसून येतें. कित्येक ग्रंथांतून ह्या दोन्ही पद्धतींची भेसळ झालेली आढळून येते. उदाहरणार्थ, एका ग्रंथांतील शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानात्मक राज्यपद्धतीविषयीं क्लूप्ति पहा. ह्या क्लृप्तींत तीन सिद्धांत ठरवावयाचे आहेत. (अ) शिवाजीची राज्यपद्धति अष्टप्रधानात्मक होती; (ब) ती मुसुलमानांच्या राज्यपद्धतीहून निराळी होती; (क) व युरोपांतील क्याबिनेट गव्हर्नमेंटसारखी ती होती. ह्या क्लृप्तींतील पहिला भाग म्हणजे (अ) तेवढा बहूवंशीं पश्चाद्ग्रहोत्पन्न म्हणजे साधार आहे. शिवाजीच्या ज्या बखरी व एक दोन अस्सल कागदपत्र आजपर्यंत प्रसिद्ध झाले आहेत त्यांच्या आधारावर शिवाजीची राज्यपद्धति (अष्ट) प्रधानात्मक होती असें विधान करण्यास कांहीं एक हरकत नाहीं. आतां त्या प्रधानांची संख्या आठ होती किंवा त्याहून जास्त होती ह्या गोष्टीचा विचार करणें जरूर आहे. काव्येतिहाससंग्रहांतील ४०४ हें पत्र शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या वेळचा कानूजाबता आहे. ह्या पत्रांत मुख्य प्रधान, अमात्य, सचीव, सेनापति, पंडितराव, न्यायाधीश, मंत्री, चिटणीस, सुमंत, बक्षी, सेनाधुरंधर, अशा अकरा अधिका-यांची प्रधानांत गणना केली आहे. (इ) युद्धादि प्रसंग किंवा (फ) राजपत्रांवर चिन्ह करण्याचा अधिकार ज्यांना असेल ते प्रधान होत असा ह्या कानूजाबत्यांतील मायन्याचा आशय दिसतो. ह्या आशायाप्रमाणें वर दिलेले अकरा अधिकारी प्रधान ठरतात, परंतु ह्या कानूजाबत्यांच्या शेवटल्या कलमांत ह्या प्रधानमंडळाला. अष्टप्रधान म्हणून संज्ञा दिली आहे. तेव्हां अष्टप्रधान ही संज्ञा टिशिष्ट संख्यावाचक नसून केवळ समुदायवाचक आहे असा सिद्धांत काढणें अवश्य होतें ह्या सिद्धांताला पोषक असें शिवाजीच्या कारकीर्दीतील दुसरें एखादे पत्र अद्यापपर्यंत उपलब्ध नाहीं. परंतु, राजारामाच्या कारकीर्दीत अष्टप्रधानांत एकंदर नऊ असाम्या होत्या असें राजारामाच्या बखरींवरून ठरतें. तसेंच शाहूमहाराजांच्या कारकीर्दीतहि नऊ असाम्या होत्या असें काव्येतिहाससंग्रहांतील ४०५ पत्रावरून कबूल करावें लागतें.