प्रस्तावना
विवेचन आठवें.
१७५० पासून १७६१ पर्यंतच्या मराठ्यांच्या इतिहासाचा थोडाबहुत उलगडा करण्याचा अल्प प्रयत्न मागील सात विवेचनांत केला आहे. त्यावरून असें मत होतें का, काव्येतिहाससंग्रह, ऐतिहासिकलेखसंग्रह व प्रस्तुतचा ग्रंथ ह्या तीन पुस्तकांत जो पत्र व्यवहार सांपडला आहे तो अत्यंत त्रोटक आहे. ह्या दहा वर्षांत मराठ्यांचा खटाटोप केवढा अवाढव्य होता हें दाखविण्यास त्याचा उपयोग झाला आहे हें खरें आहे. परंतु, ह्या खटाटोपाचा व त्याच्या निरनिराळ्या अंगांचा सविस्तर, सकारण व विश्वसनीय वृत्तांत देतां येण्यास अद्यापि पुष्कळच आणखीं पत्रव्यवहार सांपडला पाहिजे. तो कोठें व कोणापाशीं सांपडेल ह्याचा खुलासा खालीं करतों. ह्या ग्रंथाच्या शेवटीं व्यतींच्या नांवांचें एक विल्हेवार परिशिष्ट दिलें आहे. त्या व्यक्तींच्या राहण्याच्या स्थलांचा शोध काढून त्यांचीं दफ्तरें तपासलीं पाहिजेत. इनाम कमिशनच्या वेळीं महाराष्ट्रांतील बहुतेक गांवची दप्तरें इंग्रजसरकारानें तपासलीं आहेत. त्यांतींल सनदा वगैरे कामाचे कागद वगळून बाकीचे सर्व किंवा बहुतेक कागद अद्याप जसेच्या. तसेच आहेत ते तपासण्याचें काम त्या त्या प्रांतांतील व गांवांतील शोधक लोकांनीं केलें पाहिजे. किंवा एखादी इतिहासाच्या साधनांची शोध करणारी मंडळी स्थापण्यांत येऊन तिच्या सभासदांनीं हें काम करण्याचें पत्करिलें पाहिजे. शोध करणारे गृहस्थ इतिहासज्ञ आसल्यावांचून दफ्तरें नीट तपासलीं जाणार नाहींत. खुद्द दफ्तरांच्या मालकांना आपल्या दफ्तरांत काय आहे हें माहीत नसण्याचा बहुत संभव असतो. शिवाय कोणी शोधक त्यांच्याकडे शोध करावयास गेल्यास त्याला नकारात्मक उत्तर देण्याची इतिहासाच्या औदासीन्यामुळें त्यांना संवय लागलेली असते. कोठें कोठें इतिहासाचें महत्त्व जाणणारे दफ्तरांचे मालक आढळतात. आपण स्वत: दफ्तर पाहून इतिहासाच्या उपयोगी कागद काढून देऊं म्हणून त्यांचा आग्रह असतो. परंतु शोधकांनीं स्वतःच दफ्तर पहावें हें उत्तम. इतिहासाला उपयोगी कागदपत्र टाकून देण्याचें व निरुपयोगी पत्रें दिसावयाला चांगलीं दिसतात म्हणून दाखविण्याचें व्यसन कित्येकांना लागलेलें माझ्या पाहण्यांत आहे. ह्याकरितां होईल तितकें करून शोधकांनीं स्वत: रुमाल, कागद व गळाठा तपासावा हें विशेष फायद्याचें आहें.