प्रस्तावना
समर्थ १६८१त वारले. तदनंतर पंचवीस तीस वर्षे समर्थांच्या उत्त्कींचा नाद महाराष्ट्रांतील लोकांच्या कानांत घुमत होता. त्या नादाच्या गुंगींत मराठ्यांनी १७२० पर्यंत स्वराज्याची स्थापना केली. पुढें बाजीरांव बल्लाळानें व बाळाजी बाजीरावानें हिंदुपदबातशाहीची स्थापना करण्याच्या इराद्यानें बहुतेक सर्व हिंदुस्थान देशा पादाक्रांत केला. त्यावेळी ह्या मुत्सद्यांवर तिहेरी जोखीम आलें. पूर्वी शिवाजी व रामदास यांच्या वेळीं (१) सामान्य जनांचीं मनें तयार करावयाचीं व (२) सेवकलोकांत मत्सर शिरूं द्यावयाचा नाहीं एवढें दुहेरीच जोखीम त्यावेळच्या मुत्सद्यांच्या व विचारी पुरुषांच्या शिरांवर होतें. आतां (१) सातारच्या महाराजांचें सूत्र राखावयाचें, (२) राजमंडळांतील व इतर सरदारांची मनधरणीं करावयाचें (३) व जिंकिलेल्या प्रदेशांतील लोकांचीं मनें आपल्याकडे वळवून घ्यावयाचें तिहेरी काम बाजीराव बल्लाळ व बाळाजी बाजीराव ह्या मुत्सद्यांना अवश्य झालें. ह्या तिहेरी कामाचें पहिलें कलम म्हणजे शाहूराजाचें सूत्र राखण्याचें काम ह्या मुत्सद्यांनीं उत्तम साधिलें. त्या कामीं धावडशी येथील भार्गवराम बोवांचें साहाय्य पेशव्यांना चांगलें झालें. भार्गवरामाचें शाहूवर वजन फार असून बाजीराव बल्लाळ व बाळाजी बाजीराव ह्यांच्याकडेहि पोटच्या पोराप्रमाणें त्याचा ओढा असे. त्यामुळें शाहूचें मन न दुखवितां पेशव्यांचे हित करून देणें धावडशीकर स्वामीला शक्य झालें. ज्याप्रमाणें शाहूराजाचें सूत्र ब्रह्मेंद्रानें राखिलें त्याप्रमाणें सरदारांची मनधरणीं करण्यास न जिंकिलेल्या प्रदेशांतील लोकांची मनें मराठ्यांच्याकडे वळवून घेण्यास पेशव्यानीं कांहीं व्यवस्था केली होती असें दिसत नाहीं. कांयगांवकर वासुदेव दीक्षित टोक्यास व काशीस राहून सलाबताच्या राज्यांत व काशीकर ब्राह्मणांत कांहीं खटपट करीत असत; परंतु त्यांच्या खटपटीहूनहि अवाढव्य खटपट करणारे व विचार पसरविणारे महापुरुष मराठ्यांच्या वाढत्या समाजांत एक जूट उत्पन्न करण्यास हवे होते. कानडे, तेलंग, द्रवीड, गुजराथी, बुंदेले, रांगडे, पुरभय्ये, शीख वगैरे लोकांच्या मनांत महाराष्ट्रधर्माविषयीं प्रेम उत्पन्न करण्याकरितां कोणत्याहि संस्था पेशव्यांनी स्थापलेल्या दिसत नाहींत किंवा त्या कामीं कोणा महापुरुषाचें सहाय्य घेतलेलेंहि आढळत नाहीं. ह्यामुळें तरवारीच्या जोरावर व मुत्सद्यांच्या युक्तीवर भिस्त ठेवून पेशव्यांना हिंदुस्थानांत आपली सत्ता चालवावी लागे. मुसुलमानाप्रमाणें पेशवेहि परकीय आहेत असा दुजा भाव जिंकलेल्या प्रदेशांत कायम राही व परशत्रू आला असतां पेशव्यांचे जूं झुगारून देण्यास तेथील लोक तयार असत. आपली सत्ता किती अस्थिर आहे ह्याचा अनुभव पेशव्यांना पानिपतच्या मोहिमेत पहिल्यांदां आला व तो मोठां भयानक आला. त्या वेळीं हिंदुस्थानांतील यच्चयावत् लोक मराठ्यांच्या विरुद्ध झाले. पानिपतची शेवटची लढाई होईतोंपर्यंत ह्या लोकांचा द्वेष पुरता कळून आला नाहीं हें कबूल आहे.