[२२९]                                      ।। श्री ।।            १६ आगष्ट १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासिः

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष. तुह्मांस ऐवजाविषयीं बहुतच पत्रें गेलीं. तुह्मांसारखे मातबर मामलेदार भरंवशाचे माणूस. तुह्मांकडून कांहींच तरतूद होऊन येत नाहीं. दोन लक्ष रुपये पाठविले तेवढ्यानें काय होणार? खावंद मसलतशीर असल्यास तुह्मी एकदोन सालचा अगाऊ ऐवज सरकारांत द्यावा. पुढें महालांत उगवून घ्यावा. त्यास तोहि प्रकार नाहीं. सालमजकूरची रसद व गुदस्ताची बाकी येणें. त्यास त्या ऐवजीं तुह्मीं कर्जवाम घेऊन रोख ऐवज पाठवावा. चाकरी करून दाखवावी. त्यास असाच मजकूर लिहितां आह्मी भागलों. परंतु तुमचे चित्तांत किमपिच येत नाहीं. सरकारांत पैका दिला ह्मणजे बुडाला वाटतो. असेंच चित्तांत येतें कीं काय हें कांहींच कळत नाहीं. याउपरि सर्व अर्थ ध्यानांत आणून, तुमची या प्रांतीं पत चांगली आहे, मोबदला करून मातबर ऐवजाची रवानगी करणें. पंचवीस लक्ष रुपये तुह्मांस द्यावे लागतील. याची काळजी चित्तांत धरून पत्र पावतांच ऐवजाची रवानगी करणें. दमाजी गायकवाड वगैरे वराता झाल्या आहेत. त्यांस ऐवज देणें. जाणिजे. छ ४ मोहोरम सु।। इहिदे सितैन मया व अलफ. + बहुत काय लिहिणें. हे विनंति.