[२५१] ।। श्री ।। २५ सप्टेंबर १७६०.
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्यराजश्री विसाजी गोविंद गो।। यांसिः
सेवक सदाशिव चिमणाजी नमस्कार. सु॥ इहिदे मितैन मया व अलफ. तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें पावलें. राजश्री राजे प्रिथीसिंग हे सरकारांत बहुत निष्ठेनें वर्ततात. दोघे चिरंजीव फौजसुद्धां राजश्री गोविंद बल्लाळ याजकडे चाकरीस गेले आहेत. यांणींहि इकडे सरकारकाम सिद्धवाटेचें ठाणें राघो गोविंदाकडील मवाशियांनीं घेतलें होतें तेथें हे आह्मीं मिळोन जाऊन ठाणें घेतलें. दहावीस माणूस प्रिथीसिंगाचें जखमी जाहालें. पांच सात ठार जाहलें. ठाणें घेऊन आमचे हवालीं केलें. ह्मणोन कितेकप्रकारें त्याचे निष्ठेचें वर्तमान लिहिलें तें कळलें. ऐशास, त्यांणी निष्ठेने वर्तावें व वर्ततात यांतच सर्वा गोष्टीनें त्यांचें बरे आहे. याउपरिहि तुह्मीं त्यांस सांगोन सरकारकार्यांत सादर राहात तें करणें. ठाणें आपलेकडे आहे तें कोणाकडे द्यावयाची आज्ञा करावी, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, ठाण्याचा म॥र तरी मागाहून लिहिला जाईल. तूर्त तुह्मांकडे असो देणें. प्रिथीसिंग निष्ठेने वर्ततात बरेंच आहे. त्यांचे चिरंजीव तिकडे गोविंदपंताकडे गेले आहेत. यांणींहि फौजसुद्धा या समयीं येथें यावें. ह्मणजे निष्ठा विशेष वाढेल ! तरी तुह्मीं सांगोन त्याजला, फौजसुद्धा इकडे येत तें करणें. छ १५ सफर
(लेखनसीमा).