Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

राजवाडेयांची विशिष्ट मनोवृत्ति 

स्वाभिमानशून्य जिण्याची त्यांस लाज वाटे. जदुनाथ सरकारासारखे गाजलेले इतिहास लेखक शिवाजीस 'शिवा' संभाजीस 'संभा' असें मुसलमानांच्या पध्दतीचें अवलंबन करून लिहितात याचा राजवाडे यांस मनस्वी संताप येई. मुसलमानास शिवाजी हा काफर वाटे, परंतु सरकार तरी हिंदु रक्ताचे व हिंदु संस्कृति संरक्षण करणा-याचा अभिमान बाळगणारे आहेत ना ? मग या महाराष्ट्रास स्वातंत्र्य मंदिरांत नेऊन बसविणा-या श्रेष्ठतम पुरुषांस सरकार असें हीन त-हेनें कसें संबोधतात ? आपल्या मधीलच पुढारी व विद्वान् समजले जाणारे लोक जर असें वर्तन करीत असतील तर मग कसली आशा राहिली ? परकीय लोक तर हिंदुस्थानांतील सर्वच गोष्टीस नांवें ठेवणार. राजवाडे एके ठिकाणी लिहितात 'कार्ल्याची व वेरुळची लेणीं केवळ हिंदुस्थानांतील म्हणून ती साहेबास त्याज्य व पै किंमतीची. काश्मीर किंवा महाबळेश्वरसारख्या ठिकाणची शोभा केवळ हिंदुस्थानांतील म्हणून रद्दड. शंकराचार्च, भास्कराचार्य हिंदुस्थानांत जन्मले म्हणून तुच्छ' - असें साहेबास हिंदुस्थानांतील वस्तूंचे वावडे असतें. परंतु स्वजनच जेव्हां आपल्या थोर पूर्वजांबद्दल अभिमान व पूज्यबुध्दि दाखवितनासे होतात तेव्हां काय रडावयाचें ही स्थिति पाहून, नैराश्यतिमिर पसरलेलें पाहून कोणी कार्यकर्ता पुढें येत नाही असें पाहून राजवाडे कां संतापून जाणार नाहीत ? त्यांस सर्व स्वजन तुच्छ कां वाटणार नाही ?

असो. तर राजवाडयांची मनोवृत्ति देशाभिमानानें प्रेरित झालेली होती. त्यांस पूर्वजांचे दुर्गुण स्पष्टपणें दिसत होते. शास्त्रसंवर्धन केलें नाही, कार्यप्रवणता ठेविली नाही, उद्योगधंदे, कारखाने, जगाकडे पाहून विनिर्मिले नाहीत या सर्व चुका ते कबूल करितात. संघशक्ति, थोर व उदार विचारांचा पुरस्कार एक रामदास सोडले तर झाला नाही वगैरे चुका ते मानतात. परंतु पूर्वजांच्या चुका असल्या तरी त्यांची कर्तबगारी पण नांव घेण्यासारखी आहे. प्राचीनकाळ तर सोडूनच द्या. पाणिनी, पतंजलि, राम, कृष्ण, शंकर, रामानुज यांचा काळ आपण सोडून देऊं. या महाविभूतींचा जन्म या थोर देशांत झाला म्हणून अभिमान पाहिजेच परंतु अर्वाचीन काळांतही पराक्रमी व कार्यधीर पुरुष झाले. त्यांची विस्मृति करून कसें चालेल ? विशेषत: राजवाडे यांस मराठेशाहीतील तीन व्यक्तींबद्दल फार आदर वाटे. श्री छत्रपति शिवाजी महाराज, समर्थ रामदासस्वामी, व श्रीमंत थोरले माधवराव साहेब पेशवे- या तीन विभूति- म्हणजे तीन परमेश्वरच त्यांस वाटत. महाराष्ट्रानें आपल्या हृदय मंदिरांत या तीन देवतांची सदैव पूजा करावी; त्यांच्या कार्याचें मनन करावें व त्यापासून आपली चुकती पाऊलें मार्गावर आणावी. राजवाडे हे आपल्या संध्येनंतर यातील विभूतींचे तर्पण करीत. प्राचीन ऋषींच्या नांवानें व आपल्या पूर्वजांच्या नांवें आपण तर्पण करितों. या त्रिमूर्ति म्हणजे महाराष्ट्राचे ऋषि होत. राजवाडे यांचे अंत:करण या दिव्य मूर्तीच्या पराक्रमानें भरुन येई यांत नवल नाही. कारण त्यांचें हृदय स्वदेश प्रीतीच्या शुध्द मंदाकिनीनें भरलेलें होतें. स्वधर्म, स्वभाषा, स्वदेश यांच्या बद्दलची जिवंत कळकळ, अकृत्रिम प्रेम होतें. याच प्रेमाच्या जोरावर, याच कळकळीच्या कैवारानें त्यांनी अफाट कामगिरी एकाकी राहून केली. त्यांना अंत:करणांत स्फूर्ति देणारी, चालना देणारी, प्रेरणा देणारी प्रेरक शक्ति-स्वधर्म, स्वदेश व स्वभाषा यांशिवाय अन्य कोणती असणार?

देशाभिमानपूर्ण, जाज्वल्य व प्रखर अशा देशसेवेस वाहिलेला हा थोर पुरुषा कशा मनोवृत्तीचा होता, त्यांच्या सर्व व्यवहारांतही कोणतें सूत्र अनुस्यूत होतें हें वाचकांच्या ध्यानांत आलें असेल. ही स्वदेशाची भावना, हा बाणेदारपणा, हा करारीपणा, नि:स्पृहपणा त्यांच्या इतर बारीकसारीक गोष्टीतही कसा दिसून येई हें पुढील प्रकरणी पाहूं.