कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

पण त्याच्या परस्परसंबंधात अभेद्य असे भेद नव्हते. म्हणून वर्ण किंवा जाती बदलणे किंवा वर्णावर्णातील लग्नांना वा संकरप्रजोत्पादनाला प्रत्यवाय नव्हता.

अशी ही वर्णसंस्था आपापल्या कर्मामध्ये कर्मसाधनेमध्ये व कर्मफलाच्या उपभोगामध्ये रत होऊन समाजाला संपन्न करीत राहिली. संततपणे तेच ते हत्यार व तेच ते काम अंगमेहनतीने करीत राहिल्याने कर्मफलाची निष्पत्ती वाढत गेली. निसर्गदत्त अन्नपाण्याचे सौकर्य अथवा वैपुल्य व कामाचे परंपरागत कौशल्य, त्यातून निर्माण होणारी संपत्ती यामध्ये काही काळाने वर्ण व जातिकर्मामध्ये बांधिलकी येणे अपरिहार्य होते. ते होता होता संकराची क्रिया बंद पाडण्याची प्रवृत्ती वाढली. चारही वर्षांच्या सर्वसकट विवाहपद्धतीवर बंधने आली. शेवटी संपत्तिसाधन व त्यासाठी अनुभवजन्य समाजनियमन यांमुळे वर्ण व जाती लखोटेबंद झाल्या. या आर्थिक व सामाजिक प्रक्रियेचा नियम मार्क्सच्या 'भांडवल' या ग्रंथात सांगितला आहे.

ही प्रक्रिया हिंदुस्तानच काय तर इजिप्त वगैरे परदेशातही पुरातन काली झाली होती. उत्पादन व त्यांच्या साधनांची प्रगती झाल्यावर श्रमाची त्रैवार्णिक विभागणी जाऊन त्या जागी चातुर्वर्ण्य निर्माण झाले.

त्रैवर्णिकामधून चातुर्वर्ण्यात पोचण्याची क्रिया ही एक आर्य समाजातील क्रान्तीच होती. तिचे संपूर्ण वर्णन इथे करणे शक्य नसले तरी तिचा मुख्य गाभा जो राजवाड्यांनी दिला त्याचा सारांश देणे आवश्यक आहे.

या समाजसंस्थेचे वर्गनिष्ठ किंवा वर्णनिष्ठ कर्मविभागणीचे अत्यंत प्रभावी दर्शन राजवाडे यांनी पुरुषरक्तावर जे भाष्य केले आहे त्यात मिळते. राज्य व वर्ण-बर्ग-संस्थेचे इतके पुरातन इतिहासलेखन जगाच्या कुठल्याही वाङ्मयात सापडणार नाही.

त्रैवर्णिक आर्य समाजाचा चातुर्वर्णिक समाज शूदागमनाने किंवा समन्वयाने झाला. या चातुर्वर्णिक क्रान्तिकारक घटनेमुळे आर्य समाजाची जी भरभराट झाली, पुनर्रचना झाली त्याची फोड स्वतंत्रपणे राधामाधवमध्येच संपूर्णपणे वाचणे योग्य होय. राजवाडे लिहितात : "त्रैवार्णिकांच्या समाजामधे एव्हापर्यंत शूद्राला आपले स्वतःचे असे हक्काचे स्थान नसे. ते हक्कांचे स्थान चातुर्वर्ण्य संस्थेच्या निर्मितीने शूद्रास कायमचे मिळाले. आजपर्यंत शूद्राला त्रिवर्णबाह्य अस्पृश्य व ओंगळ समजत. इथून पुढे तो चातुर्वर्ण्यान्तर्गत, स्पृश्य व सोंगळ समजला जाऊ लागला. चातुर्वर्ण्यात घेतल्यामुळे चातुर्वर्ण्याचे सामान्य धर्म पाळण्याची त्याच्यावर जबाबदारीही आली......तात्पर्य, चातुर्वर्ण्यात आल्याने शुद्राची रानटी स्थितीतून ग्राम्य स्थितीत बढती झाली."