Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना

हिंदुस्थानातील जनतेच्या जीवनाला लागणा-या सर्व वस्तूंची उत्पादनक्रिया अत्युत्तम यंत्रबलाने व तज्जन्य भौतिक व मानसिक शास्त्राने सिद्ध होऊन, त्यावरचा भांडवलदारी अर्थसंबंधांचा व राजकीय पकडीचा पूर्ण निरास होऊन हा आपला समाज अत्युच्च समाजवादी संघटनेच्या स्तरावर पोचेल तेव्हाच सर्व जातिभेदांची व वर्णांची इतिश्री होईल हा सिद्धान्त त्यांच्या आकलनात आला नाही. नाही तर राधामाधवचा व पुरुषसूक्ताचा एक नूतन आविष्कार आपल्याला पाहावयाला मिळाला असता.

ही इतिहासज्ञानाची शोकांतिका टाळता आली असती का? हेगेल आणि कॉम्टच्यापुढे त्याना व त्यांच्या ऐतिहासिक-भाषिक ज्ञानभांडाराला नेता आले असते का? या प्रश्नाला माझे स्वतःचे उत्तर होय असे आहे .पण त्याला एकच अट होती की त्यांच्यासमोर मार्क्स- एंगल्स ठेवायला हवा होता.

असे ठाम विधान करण्यासाठी काय आधार आहे ? मराठ्यांच्या पराजयाची कारणे शोधताना त्यांना पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज फौजांच्या लांब पट्यांच्या तोफांची अत्यंत प्रभावी व प्राणघातक व विजय-संपादक कामगिरी ध्यानात येऊन चुकली होती. तोफखाना, बंदुका, दारूगोळा हा मराठ्यांना अपरिचित नव्हता. शिवाजीला तोफा मिळविण्यासाठी इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीजांची काय काय मनधरणी करावी लागे, धमक्या द्याव्या लागत व पैसा आणि व्यापारसनदा द्याव्या लागत याचा पसारा त्यांच्या पत्रव्यवहारात आहे. असे असूनही हे इतके भयानक अस्त्र व शस्त्र इथेच निर्माण करणे, त्याचे मूलभूत शास्त्र अभ्यासणे या सर्वांना कां जमले नाही ? पेशवाईअखेर दिल्लीश्वरावर जरब बसवून महादजी शिंद्यानी आग्याजवळ तोफा करण्याचा कारखानाही फ्रेंच इंजिनियरना हाताशी धरून काढला होता; पण त्यासाठी त्याने लोखंड, सर्पण व रासायनिक सामग्री कुठून आणली याची चर्चा आपल्या इतिहासात नाही. ग्वाल्हेरचे दप्तर ज्या वेळी उघडले जाईल तेव्हा त्याचा खुलासा काहीतरी मिळेल.