प्रस्तावना

त्याने हे प्रस्तुत चंपूकाव्य शहाजीमहाराजांच्या सांगण्यावरून त्यांच्या मनोरंजनाकरिता व कीर्तीचा पवाडा करण्याकरिता रचले. नायकसमकालीनत्वामुळे पुराव्याच्या दृष्टीने प्रस्तुत काव्याचे महत्त्व सहजच विशेष समजले पाहिजे. कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीसंबंधाने तत्समकालीन वर्णनपर लेख अनेक प्रकारचे असू शकतात: (१) ऐतिहासिक व्यक्तीच्या ओळखीच्या मनुष्याने त्या व्यक्तीविषयी त्याच्या संमतीशिवाय लिहिलेले लेख (२) ऐतिहासिक व्यक्तीच्या ओळखीच्या व विश्वासाच्या मनुष्याने त्या व्यक्तीविषयी त्याच्या आज्ञेने व संमतीने लिहिलेले लेख व (३) ऐतिहासिक व्यक्तींशी प्रत्यक्ष ओळख बिलकुल नसणा-या मनुष्याने अर्थात त्याच्या संमतीशिवाय लिहिलेले लेख. लेखक लेख लिहिण्यास सर्वथैव पात्र आहे अशी कल्पना केल्यास, वरील तीन प्रकारच्या लेखांपैकी पहिल्या प्रकारचे लेख विशेष निस्पृह निपजण्याचा संभव असतो, दुस-या प्रकारचे लेख आश्रयदात्याच्या बरेच स्तुतिपर असण्याचा संभव असतो व तिस-या प्रकारचे लेख केवळ ऐकीव व कमीजास्त अविश्वनीय उतरण्याचा संभव असतो. तशात मालकाकडून द्रव्यादी मिळवण्याची इच्छा करणारा जर लेखक असेल तर मिंधेपणामुळे त्याचे लेख स्तुतिपरतेकडे सहज झुकून सत्येतिहासाची हानी करणारे असतात. तसेच मानसन्मान किंवा द्रव्यद्रविण इत्यादींची अपेक्षा करणारा नसूनही जर लेखक धन्याच्या, पुढा-याच्या किंवा वीराच्या तेजाने दिपून गेलेला असेल तर त्याचे लेख प्रशंसैकपर होतात. उलट, वस्तुनायकाचा कोणत्याही कारणाने द्वेष, तिरस्कार किंवा अपमान करणारा लेखक असेल तर त्याच्या मनोविकारांची छटा त्याच्या लेखांत उतरल्याशिवाय राहात नाही. ह्या दृष्टींनी पाहाता प्रस्तुत कवी द्रव्यादींच्या अपेक्षेने आश्रयदात्याच्या इच्छेवरून त्याचे स्तुतिस्तोत्र गाण्यास मुद्दाम सज्ज होणा-या भाडोत्री लेखकांच्या वर्गात पडतो, असे म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही. तथापि, अशा भाडोत्री लेखकांच्या लेखांतून ऐतिहासिक सत्य निवडून काढण्याच्या पद्धती आहेत. वर्ण्य व्यक्ती राष्ट्रीयदृष्ट्या अतीच अती मोठी असेल व शौर्यौदार्यादिगुणगणमंडित असेल, तर द्रव्यार्थी भाडोत्री लेखकानेही केलेली निरर्गलशी दिसणारी प्रशंसा सुद्धा मूळ गुणांची सर्वथैव मापक होण्याचा संभव असतो. प्रस्तुत कवीने केलेली शहाजी महाराजांची वर्णना किंचित व क्वचित् ह्या शेवटल्या मासल्याची भासण्याचा संभव आहे. शहाजी हा शिवाजीची पूर्वावृत्ती आहे आणि मोंगलाई, निजामशाही, आदिलशाही व कुतुबशाही अशा पाचचार शाह्यांच्या वावटळीतून सनातन धर्माचे व स्वराज्याचे कर्नाटकात पुनरुज्जीवन करणारा वीराग्रणी व धोरणाग्रणी आहे. अशा असामान्य व्यक्तीचे वर्णन कोणी कितीही मिंधा असला किंवा निस्पृह असला तरी तत्रापि प्रशंसेतर कसा करू शकेल? फार तर प्रशंसेत कमी अधिक रागरंग चढेल किंवा घटेल इतकंच. जयराम हा बोलूनचालून कवी आहे, नीरस इतिहासकार नाही. तेव्हा उत्प्रेक्षा, उपमा इत्यादी अलंकारांनी त्याची वाणी नटली असल्यास त्यात काही नवल नाही. परंतु अलंकार घालावयाचे तेही कवीने बाताबेतानेच घातले पाहिजेत. जयरामाची मुख्य दृष्टी अलंकार करण्याकडे असूनही त्याने नायकाचे पराक्रम-वर्णन थोडेबहुत केले आहे आणि येथेच इतिहासाभ्यासकांना खाद्य मिळण्यासारखे आहे व अलंकारांचे अवगुंठन एकीकडे सारून ऐतिहासिक सत्य सापडण्याची खात्री आहे. हा इतिहासभाग निवडून काढण्याच्या आशेने प्रस्तुत काव्याचे प्रथम रूपवर्णन करतो आणि नंतर त्यात शहाजीराजे भोसले यांच्या संबंधाने जी जी ऐतिहासिक विधाने केली असतील त्या सर्वांचे यथाक्रम अवतरण व परीक्षण करतो.