मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

महाराष्ट्र बांधवांस विनंति.

आह्मांजवळ जरी सध्या सुरू केलेलें ४८ पृष्ठांचें मासिक पुस्तक दहा पंधरा वर्षे चालेल इतके कागदपत्र आहेत तथापि महाराष्ट्रांतील अनेक इतिहासप्रसिद्ध पुरुषांच्या वंशजांपाशीं व आप्तेष्टांच्या घरीं महाराष्ट्राच्या इतिहासाची पुष्कळ सामग्री इतस्ततः माळ्यावर किंवा तळघरांत फुकट रद्दी ह्मणून पडलेली असते; असा आमचा अनुभव आहे. तर तसल्या जुन्या अव्याहत परंपरेच्या घरंदाजांनीं आपली तळघरें, अंबारें आणि माळे वगैरे शोधून किंवा कित्येकांच्या घरीं पिढ्यानुपिढ्या बंद असणा-या पेट्या शोधून महाराष्ट्राच्या इतिहासास उपयोगी पडणारे कागदपत्र कृपा करून आह्मांकडे पाठवावे. आह्मी अशा गृहस्थांस त्यांचे मूळ कागद नकला करून घेऊन परत पाठवूं आणि छापविल्यावर त्यांच्या दोन दोन प्रतीही त्यांस पाठवूं. आमची ही विनंति फुकट जाणार नाहीं आणि महाराष्ट्र इतिहासाच्या सांखळीचे मधलेच चुकलेले दुवे लवकरच जागच्या जागीं येऊन महाराष्ट्राचा सुसंगत इतिहास दहाबारा वर्षांच्या आंत लिहितां येणें शक्य होईल अशी फार उमेद आहे. तर लोकांनीं प्रयत्नपुरस्सर आह्मांस चहुंकडून कच्चीं साधनें ह्मणजे कागदपत्रें पुरवावींत इतकेंच त्यांजपुढें पदर पसरून आमचें मागणें आहे.

मित्ति वैशाख शुद्ध १ शके १८२६.

संपादक.